
अमळनेर (प्रतिनिधी) पालिकेच्या प्रारूप वार्ड रचनेत ३५ हरकतदारांपैकी ३२ जण सुनावणीला हजर होते ३ गैरहजर होते. उपस्थितांची सुनावणी घेण्यात आली.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात नागरिकांनी घेतलेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. गेल्या निवडणुकीत अमळनेर शहरात १७ प्रभाग होते. त्यामुळे शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात एक प्रभागात ५६०० मतदार होते. त्याच्या १० टक्के कमी किंवा जास्त मतदार प्रभाग रचना करताना चालू शकत होते. मात्र आता शहरात १८ प्रभाग झाले आहेत. प्रत्येक प्रभाग हा ५३३३ मतदारांचा असून पैकी १० टक्के कमी म्हणजे ४८०० ते १० टक्के जास्त ५८६६ दरम्यान प्रभागात मतदार असावेत या पद्धतीने रचना करताना पालिका अधिकाऱ्यांना कसरत करावी लागली आहे. जपान जीन, मेहतर कॉलनी, ताडेपुरा, सिंधी कॉलनी, वाडी संस्थान आदी भागाबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यावेळी पालिकेचे अधिकारी उपमुख्याधिकारी रवींद्र चव्हाण, बांधकाम अभियंता सुनील पाटील, डिगंबर वाघ, नगररचना विभागाचे मयूर तोंदे, सौरभ बागड, शेखर देशमुख, महेश जोशी, मनोज निकुंभ, अविनाश बोरसे यांनी सुनावणी कामी सहकार्य केले. प्रभाग रचना समजावून घेण्यासाठी आणि तक्रारदाराना समजावण्यासाठी मोठ्या डिजिटल पडद्यावर शहराचा नकाशा, आयोगाने निर्देशित केलेल्या सीमा दाखवण्यात येत होत्या. यावेळी प्रवीण पाठक, पंकज चौधरी, बाळासाहेब संदानशीव, गोपी कासार, चेतन राजपूत, नरेश कांबळे, सलीम टोपी, ॲड. शकील काझी, चंद्रकांत कंखरे, राहुल कंजर, ॲड. सुरेश सोनवणे, भूषण भदाणे, प्रवीण बैसाणे, किरण बहारे, संजय पारधी, फिरोज मिस्तरी, सुरेश पाटील, संतोष पाटील, नितीन लोहरे यांनी हरकतीच्या वेळी मुद्दे मांडले.