
अमळनेर (प्रतिनिधी) येथील यशवंत सभागृहात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व धनदाईमाता कला व विज्ञान महाविद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने पीएमयूएसएचए योजनेंतर्गत ‘मुले आणि मुलींसाठी समुपदेशन’ कार्यक्रम झाला. यात २०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात पं. ज. ने. समाजकार्य महाविद्यालय, देवळी आणि कै. म. तु. न्हा. पा. कला महाविद्यालय, मारवड येथील विद्यार्थीही सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉ. संदीप नेरकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्ष म्हणून धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील हे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब के. डी. पाटील, संचालिका नयना पाटील आणि रेखाताई पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या उपक्रमातील प्रथम सत्रात शहादा येथील तज्ञ मार्गदर्शक विनायक साळवे यांनी ‘विवेकी जोडीदार कसा निवडावा?’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या व्याख्यानात तरुणांना जोडीदाराची निवड करताना बाह्य सौंदर्यापेक्षा त्यांचे विचार, स्वभाव आणि समजूतदारपणा या गुणांकडे अधिक लक्ष देण्याचे महत्त्व सांगितले. दुसऱ्या सत्रात दर्शना पवार यांनी ‘तरुणांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर दिले. त्यांनी सध्याच्या स्पर्धात्मक युगात तरुणांवर येणाऱ्या ताण-तणाव आणि अपेक्षांचे ओझे याबद्दल बोलले. त्यांनी स्वतःच्या अनुभवातील उदाहरणे आणि काही प्रेरणादायक कथा सांगून विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य जपण्यासाठी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात, एस. एस. व्ही. पी. एस. महाविद्यालय धुळे येथील मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. संदीप जाधव यांनी ‘मानसिक समस्या व ताणतणाव’ या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना जागरूक केले. त्यांनी ताणतणाव आणि मानसिक समस्यांची वैज्ञानिक कारणे स्पष्ट केली. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे, नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेणे, यासारख्या गोष्टींचे महत्त्व त्यांनी समजावून सांगितले. शेवटच्या सत्रात डॉ. लीना चौधरी यांनी ‘वैयक्तिक स्वच्छता व आरोग्याची काळजी’ या विषयावर सविस्तृत माहिती दिली. त्यांनी वैयक्तिक स्वच्छतेचे महत्त्व आणि चांगला आहार, पुरेशी झोप या सवयी कशा आपल्या जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात, हे सांगितले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. जयवंत पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. महादेव तोंडे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रमेश पावरा, डॉ. प्रवीण पवार, प्रा. मेघना भावसार, कैलास अहिरे, एस. बी. गिरासे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. लीलाधर पाटील आणि प्रा. मीनाक्षी इंगोले यांनी केले. समन्वयिका डॉ. संगीता चंद्राकर यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.