
अमळनेर (प्रतिनिधी) कला आणि सांस्कृतिक क्षेत्रा बरोबरच धार्मिकतेचा वसा व वारसा जपणाऱ्या शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा उत्तराखंड मधील चार धाम पैकी एक असलेल्या बद्रीनाथ धाम मंदिराची भव्य दिव्य प्रतिकृती साकारली आहे. या देखाव्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या भव्य मंदिराच्या प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर आत मध्ये वास्तवदर्शी श्री बद्रीश पंचायतन देखावा साकारण्यात आलेला आहे.
देखाव्यात आधुनिक लाईट्स आकर्षक सजावट तसेच ध्वनी प्रकाश परिणामांचा वापर करून बद्रीनाथ धामच्या वातावरणाचा अनुभव गणेश भक्तांना येत असून हा भव्य देखावा भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. सोबतच आर्केस्ट्राच्या माध्यमातून श्री गणेशाची तसेच अध्यात्मिक व भक्ती गीते सादर करण्यात येत असल्यामुळे संपूर्ण परिसर भक्तीमय घोषणांनी दुमदुमून निघत आहे. सदर देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे. सायंकाळी सहा वाजेपासून आरास पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
मंडळाने यंदाही जोपासली परंपरा
गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, राष्ट्रीय एकात्मता,व अध्यात्मिक यावर प्रबोधनात्मक देखावे तयार करण्याची मंडळाची परंपरा आहे. मार्केट कमिटीचे सभापती व संचालक मंडळ तसेच गणेशोत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या अथक परिश्रमामुळे भव्य दिव्य बद्रीनाथधाम देखावा साकारला गेला आहे.
– गौरव धनंजय पाटील अ ध्यक्ष-कृषी उत्पन्न बाजार समिती गणेशोत्सव मंडळ, अमळनेर