आपल्याच गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला आणि लहान मुले का सहभागी होत नाहीत ?

अमळनेरात शांतता कमिटीच्या बैठकीत एसपी महेश्वर रेड्डीनी प्रबोधन करून टोचले कान

 

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेरमध्ये मात्र रात्री १० वाजता तुम्ही मिरवणूक बाहेर काढता म्हणजे पोलिसांची व कायद्याची तुम्हाला किंमत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सन्मान नाही. हे  तुम्हाला खरंच योग्य वाटते का? याठिकाणी विनाकारण घोषणा देऊन भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. विशेष म्हणजे आपल्याच गणेश विसर्जन मिरवणुकीत महिला व आपली लहान मुले का सहभागी होत नाहीत याचा विचार आपण केला पाहिजे, इतर गावात होणाऱ्या मिरवणुकांचे चित्र पहा, पोलीस व कायद्याचा सन्मान राखा आणि पुण्यभूमी अमळनेरचे नाव खराब होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डीनी यांनी करून अमळनेरकरांचे चांगलेच कान टोचले.

 गणेशोत्सव ईदच्या पार्श्वभूमीवर अमळनेरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्याने पोलीस विभागाच्या वतीने तातडीची शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली. सुरवातीला हिंदू कार्यकर्त्यांची बैठक वाणी मंगल कार्यालयात तर त्यानंतर मुस्लिम कार्यकर्त्यांची बैठक इंदिरा भुवन येथे झाली. वाणी मंगल कार्यालयात हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांचे प्रबोधन करताना एसपी रेड्डी पूढे म्हणाले की, जळगाव जिल्ह्यात माझे ३६ पोलीस ठाणे असून सगळीकडे रात्री १२ पर्यंत वेळेतच विसर्जन झाले आहे. चोपडा शहरात देखील सकाळी १० वाजता मिरवणूका निघून रात्री १२ ला सर्वानी एकत्र वाद्य बंद केले. त्याठिकाणी मिरवणुकीत ५० टक्के महिला व लहान मुले होते. अमळनेरमध्ये मात्र रात्री १० वाजता तुम्ही मिरवणूक बाहेर काढता म्हणजे पोलिसांची व कायद्याची तुम्हाला किंमत नाही. पूर्वी असे वातावरण चोपडा येथे होते, पण त्यांनी सर्वानी एकत्र येऊन हे सर्व थांबविले आहे. अमळनेर मध्ये कालच्या घटनेत १२ मुलांना ताब्यात घेतले असुन अजून २०  ते २१  मुलांना ताब्यात घेणार आहोत.लहान मुलांमध्ये एवढा राग कशासाठी,आपापली आचारसंहिता प्रत्येकाने पाळलीच पाहिजे असे सांगत आपली मानसिकता खराब का होतेय हे सर्वानी तपासा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी विजय पाटील, मनोज शिंगाने,योगीराज चव्हाण,जाधव,पंकज भोई,भोईराज यासह इतरांनी यापुढे गावात शांतता नांदवीन्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही सर्वांच्या वतीने दिली. बैठकीस डीवायएसपी विनायक कोते, एलसीबी पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड ,पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम,प्र.तहसीलदार सी यु पाटील ,न प चे मुख्याधिकारी तुषार नेरकर , बांधकाम अभियंता सुनील पाटील व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. त्याच प्रमाणे मुस्लिम बांधवांची बैठक इंदिरा भुवन मध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते आणि भगिनी देखील उपस्थित होत्या.

 

अमळनेरकरांसाठी धोक्याची घंटा

 

अप्पर पोलीस अधिक्ष कविता नेरकर मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, या शहरात एक वर्षांपासून माझे निरीक्षण असून अमळनेरचे वातावरण बिघडले आहे, दोन समाजात निर्माण होणारी तेढ धोकादायक आहे. येथील तरुणाई सोबत जेष्ठ मंडळींकडून चर्चा झाली पाहिजे. विनाकारण खुन्नस देणे, सोशल मीडियावर चुकीचे संदेश पसरविणे यामुळे अमळनेरची शांतता भांग झाली असून हे पोलीसांसाठी नव्हे तर अमळनेरकरांसाठी धोकादायक आहे. हे शहर तुमचे आहे, सर्व व्यवहार एकमेकांशी निगडित आहेत. येणाऱ्या पिढीसाठी पोषक वातावरण करणे तुमच्या हातात आहे. सण आनंदासाठी असतो हे आपण विसरलो आहे. जिल्ह्यात फक्त अमळनेरलाच पहाटे ५ वाजता मिरवणूक संपली हे चांगले लक्षण नाही. विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना विनाकारण त्रास दिला गेला. निम्म्याच्यावर दारू पिउन होते, हे चुकीचे असल्याबाबत खंत त्यांनी व्यक्त केली.

 

गावाचे नाव होतेय बदनाम

 

अमळनेरचे प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे म्हणाले की, प्रत्येक गाव काहीतरी वैशिट्यासाठी ओळखले जाते. तसेच अमळनेर धार्मिक सोबतच व्यापारी शहर म्हणून ओळखले जाते, पण अश्या घटना घडत गेल्या तर गाव बदनाम होऊन आपल्याच लोकांना ते भोगायला लागणार आहे. मालेगाव सारख्या गावांनी हे प्रकार सोडून व्यापार क्षेत्रात ते पडले आहेत. उत्सव आपण आनंदासाठी साजरा करतो पण येथे आपण स्वतः व इतरांना देखील टेन्शनमध्ये ठेवत असतो. नाचण्यासाठी डीजेच कशाला पाहिजे, शिस्तीने एकाच मार्गावर सर्व मिरवणुका का येत नाहीत. एवढा गुलाल का उडवीला जातो असे सवाल उपस्थित करून हे सर्व थांबवून अमळनेर शहराचे नाव उज्वल करा असे आवाहन त्यांनी केले.

 

मिरवणुकांचे मार्ग बदलवा : मिस्तरी

 

एसपी रेड्डी यांनी इंदिरा भुवन येथे मार्गदर्शन करून मुस्लिम कार्यकर्त्यांचे प्रबोधन केले. माजी नगरसेवक हाजी शेख सलीम फत्तु उर्फ शेखा मिस्तरी यांनी दोन्ही समाजाकडून गणेश विसर्जन व ईद निमित्त दगडी दरवाजातुन काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांचे मार्ग बदलवून अन्य पर्यायी मार्ग दिल्यास असे वाद होणारच नाहीत, असे सांगत पोलीस प्रशासनाने पुढील वर्षी याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. तर मुक्तार खाटीक यांनी  मुस्लिम बांधवांचे म्हणणे देखील पोलिसांनी ऐकून घ्यावे, अशी सूचना मांडली.

 

  • Related Posts

    *स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

    : *चालु घडामोडी*   *11 सप्टेंबर – 2025*   🔖 *प्रश्न.1) टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक कोण ठरले आहेत ?*   *उत्तर -* प्रताप सरनाईक   🔖 *प्रश्न.2) “ऑपरेशन सिंदूर”…

    *स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांसाठी..* *”खबरीलाल”चे खास ”ज्ञानाचा खजिना” सादर*

      ❇️ TCS /IBPS pattern ❇️   1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ? 1. गुजरात ✅ 2. सिक्किम 3. आसाम 4. महाराष्ट्र 👉 भारतातील पहिले सेंद्रिय…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *