
महिलांना अश्लील शिवीगाळ व इशारे, पोलिसांत केला गुन्हा दाखल
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात ईद-मिलाद निमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान गांधलीपुरा पोलिस चौकीजवळ महिलांना अश्लील शिवीगाळ व इशारे करून दगडफेकीची घटना घडल्याने शहरात पळापळ झाली. यात एलसीबी पोलीस निरीक्षक जितेंद्र वलटे, पोकॉ हितेश बेहरे यांना देखील दगड लागला. आणि एका नागरिकाला दगड लागून तोही गंभीर जखमी झाला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच नियंत्रण आणले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शहरात गणेश विसर्जन व ईद-मिलाद मिरवणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ८ रोजी सायंकाळी मिरवणूक आटोपून शिवशक्ती चौकाच्या गल्लीतून जात असताना मोहसीन मेहमूद बागवान, शाहरुख बागवान, तन्वीर बशीर खाटीक, रेहान कलीम खाटीक व त्यांच्यासोबत चार पाच जण यांनी गल्लीतील महिलांना अश्लील शिवीगाळ व इशारे करू लागले. तसेच दगडफेक सुरू केली. एका महिलेच्या टाचेला दुखापत झाली. महिलांनी पोलीस स्टेशन गाठून वरील सर्व जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता ७९, २९६ , ११५(२),३५१(२), ३५२, १८९ (२),१९१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहेत.
पोलिस अधीक्षकांनी दिली भेट
दरम्यान, जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शहरात पोलीस फोर्स, होमगार्ड, व तालुकास्तरीय अधिकारी तैनात करण्यात आले होते. मिरवणुकीदरम्यान डॉ. रेड्डी यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, एलसीबीचे निरीक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते. घटनेनंतर पोलीस अधीक्षकांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली.
अफवांवर विश्वास ठेवू नये.: पोलिस
पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच समाजात तेढ निर्माण होईल अशा कोणत्याही प्रकारचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करू नये. असे प्रकार आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.