
प्रसिद्ध बिल्डर प्रशांत निकम यांच्या आदर्श उपक्रमाने दिला पर्यावरणपूरक आणि जातीय सलोख्याचा संदेश
अमळनेर (प्रतिनिधी) आर्थिक सुबत्ता असूनही गणेशोत्सवाचे पावित्र्य राखण्यासाठी कोणताही बडेजावपणा न आणता अमळनेर येथील सुप्रसिद्ध बिल्डर प्रशांत निकम यांनी घरीच आपल्या हस्ते शाडू मातीची सुबक पर्यावरणपूरक मूर्ती बनवून त्याचे विसर्जन देखील घरातच मोठ्या टपामध्ये केले. विशेष म्हणजे विसर्जन प्रसंगी त्यांनी सर्व जाती धर्मांसह मुस्लिम समाज बांधवाना देखील सहभागी करून घेतले. त्यांचा हा पर्यावरणपूरक उत्सव आणि जातीय सलोखा अमळनेरकरांसाठी खास आदर्श ठरला आहे.
प्रशांत निकम हे अमळनेर येथील बिल्डर असून त्यांचे संपुर्ण कुटुंब सामाजिक विचारसरणीचे आहे. अमळनेर शहरात आदित्य बिल्डरच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या वास्तू त्यांनी उभ्या केल्या आहेत. आपण मोठ्या इमारती निर्माण करू शकतो मग ज्यांना आपण परमेश्वर मानतो ती गणेश मूर्ती का नाही करू शकत? असा विचार त्यांच्या मनात डोकावल्याने त्यांनी आपल्या दैनंदिन व्यस्त कामातूनही 7 दिवसात दोन ते तीन तास वेळ काढत घरीच शाडू मातीची सुबक मूर्ती साकारली. यासाठी पत्नीसह कुटुंबियांचेही सहकार्य त्यांना लाभले. मूर्ती तयार झाल्यानंतर विधिवत स्थापना करून दररोज 11 दिवस भक्ती भावाने पूजाअर्चा, आरती व धार्मिक कार्यक्रम पार पडले. यात शेजाऱ्यांसह गावातील हितचिंतकही सहभागी झाले. अनंत चतुर्दशीला मुस्लिम बांधवासह सर्व जाती धर्माच्या स्नेहीना निमंत्रित करून पारंपरिक वाद्य लावत गल्लीतच छोटेखानी मिरवणूक काढली. यात गुलाल टाळून फुल पाकळ्या उधळण्यात आल्या. शेवटी मिरवणूक घरी आल्यानंतर घरातील मोठ्या टपात भक्तिभावाने विसर्जन करून लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. या पर्यावरणपूरक व सामाजिक एकतेचे प्रतिक असलेल्या गणेशोत्सवाचे यावेळी उपस्थित असलेल्या वसुंधरा लांडगे, ॲड. शकील काझी, हरी भिका वाणी, दिलीप जैन, एन.के. पाटील, दिनकर पाटील, हिरामण कंखरे, अरुण देशमुख, रियाझ मौलाना, जमील मुजावर, रहीम शेख, ॲड. रज्जाक शेख, जाकीर शेख, मंगलसिंग, भाग्यश्री वंजारी यासह इतर उपस्थितांनी तोंडभरून कौतुक केले.
देव पैशाने नव्हे भक्ती भावाने निर्माण करायचा असतो
खरे पाहता देव पैशाने विकत घ्यायचा नसतो तर भक्ती भावाने स्वतः निर्माण करायचा असतो, घरी मुर्ती बनविता येत नसेल तरी भक्तिभावाने मातीचा गोळा जरी केला तर तोच आपला देव असतो हा भाव असणे महत्वाचे आहे. देव प्रत्येक माणसामध्ये, प्रत्येक जाती मध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये तो पहायचा असतो, कारण देवानेच बनविलेला हा निसर्ग असून त्याचे संगोपन करणे हे आपलेसर्वांचे कर्तव्य आहे. फार मोठा निरर्थक खर्च करूनच तो पावतो असे कुणाला वाटत असेल तर तो आपला भ्रम आहे.लाखो मूर्ती पाण्यात विसर्जित केल्यानंतर आपण निसर्गच खराब करीत असून तशी परवानगी आपल्याला देवाने दिलेली नाही,आपला खारीचा वाटा म्हणून आपण निसर्ग वाचवू शकतो म्हणून मी घरीच पर्यावरणपूरक विसर्जन केले. शाडू मातीच्या मूर्तीने प्रत्येकाने पुढील वर्षी गणेशोत्सव अश्या प्रकारे साजरा करण्याचा प्रयत्न करावा. तसेच सर्व जाती धर्माना निमंत्रित करून आपण सारे एक आहोत हाच संदेश देण्याचा प्रयत्न मी केला आहे.
– प्रशांत मनोहरराव निकम,अमळनेर