
अमळनेर (प्रतिनिधी) पारोळा – तालुक्यातील वाघरे गावाजवळ भडगाव पारोळा महामार्गावर बस आणि टेम्पोच्या धडकेत जखमी झालेल्या तालुक्यातील ढेकू खु. येथील वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आता या अपघातातील मृतांची संख्या दोन झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक २० ऑगस्ट रोजी झालेल्या या अपघातात टेम्पो चालक जागीच ठार झाला होता. तर ४२ जण जखमी झाले होते. या अपघातात एसटी मध्ये प्रवास करत असलेले ढेकू खु. येथील रघुनाथ गणपत पाटील (सोनवणे, वय – ८३ ) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर २० ऑगस्टपासून खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने डॉक्टरांनी त्यांना घरी नेण्यास सांगितले होते. ५ सप्टेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघातातील मृताच्या नातेवाईकांना व जखमींना तत्काळ मदत मिळावी अशी मागणी होत आहे.