अमळनेर शहरात ३५ पथकांच्या मार्फत सर्वेक्षण, 989 घरात डेंग्यू डासांच्या आढळल्या अळ्या
अमळनेर (प्रतिनिधी) डेंग्यूचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी अमळनेर नगरपरिषदेने एकाचवेळी ३५ पथकांच्या मार्फत शहरातील सर्व २७ हजार कुटुंबाचे कीटक शास्त्रीय सर्वेक्षण सुरू केले आहे. १३ ऑगस्टपर्यंत 54394 लोकसंख्या असलेली 13265 घरे तपासली. त्यात 989 घरात 1752 कंटेनर दूषित म्हणजे डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत.
यावर्षी शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संथगतीने वाढ होत असली तरी डेंग्यूचे डास इकडून तिकडे स्थलांतरित होतात. आणि इतरत्र रुग्ण आढळतात. त्यामुळे एकाचवेळी सर्वेक्षण करून तेथील डेंग्यूच्या अळ्या नष्ट केल्या तर डेंग्यूचे निर्मूलन होईल. म्हणून मुख्याधिकारी तुषार नेरकर, पालिकेचे वैद्यकीय अधिकारी आणि तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी संयुक्त रित्या सर्वेक्षण सुरू केले आहे. आरोग्य सेवक, परिचारिका, आशा स्वयंसेविका, अशांचे ३५ पथक नेमून प्रत्येक घरातील फ्रीज मागील भांडे, छतावरील रिकाम्या वस्तू, पक्ष्यांचे पाणी पिण्याची भांडे, फुटलेले मटके, टायर, बादल्या, नारळाच्या करवंट्या तपासल्या जात आहेत. विशेष म्हणजे फ्रीजच्या मागील भांड्यात पाणी साचत असल्याने डासांच्या अळ्या अधिक प्रमाणात आढळून येत आहेत. पाण्याचे दूषित कंटेनर खाली करण्यात येत आहेत. दररोज धुरळणी, कीटक नाशक फवारणी केली जात आहे. डबक्यात, अॅबेट टाकले जात आहे.
नागरिकांनी स्वछता ठेवावी
ग्रामीण भागातून आणि शहरातील कर्मचारी एकत्र बोलावून एकाचवेळी सर्वेक्षण करून डेंग्यूचा पूर्ण नायनाट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी स्वछता ठेवावी पाण्याचे भांडे उघडे राहू देऊ नये.
– डॉ. विलास महाजन, वैद्यकीय अधिकारी नगरपालिका अमळनेर