अरे, बाप रे अमळनेर अर्बन बँकेतही अपहार !

संचालक भरतकुमार ललवाणींचा गंभीर आरोप 

 

कोणत्याही प्रकारचा अपहार झाला नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर अर्बन बँकेच्या सुशोभिकरण आणि फर्निचरच्या कामात अपहार झाल्याचा गंभीर आरोप बँकेचे संचालक भरतकुमार ललवाणी यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे बँकेच्या कारभारावर आता प्रश्न चिन्ह निर्माण झाले असून संचालकानेच एल्गार पुकारल्याने आतापर्यंत बाहेर येत नसलेल्या बाबीही चव्हाट्यावर येणार आहे. यामुळे बँकेचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दरम्यान, खर्चाच्या विगतवारीच्या मागणी संदर्भात ललवाणी हे येत्या १५ ऑगस्ट रोजी उपोषणाचाही मार्ग अवलंबवणार असल्याचे समजते.

अमळनेर शहरात आता ही एकमेव अर्बन बँक उरली होती.शहरातील सर्व पतपेढ्या डबघाईला गेल्या आहेत. त्यामुळे ठेवेदारांना खूप त्रास झाला. त्यामुळे आता या बँकेलाही भ्रष्टाचाराची शनि लागला की काय असे वाटू लागले आहे. या बँकेतील अपहाराचे काहीच आतापर्यंत बाहेर येत नव्हते. डायरेक्टरानेच एल्गार पुकरल्याने आता ठेविदारांच्या रांगा लागायला नको. कारण अंदाज पत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चात बँक नूतनीकरणाचा खर्च घेण्यासंदर्भातील विषय क्रमांक ३ व ८ या विषयांना अर्बन बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विद्यमान संचालक भरतकुमार सुरेश ललवाणी यांनी लेखी हरकत घेत कार्यालय नूतनीकरनात अपहार झाल्याचा गंभीर आरोप करून खळबळ उडाली आहे. यासंदर्भात त्यांनी पीठासन अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे की दि. ३ जुलै २०२५ रोजी बँकेत झालेले फर्निचर व कार्यालयाचे सुशोभिकरणाचे कामात लाखो रुपयांचा अपहार झाल्याबाबत व त्या अपहाराबाबत तक्रार देण्याकरीता मागितलेली खर्चाची विगतवारीची माहिती न मिळाल्याबद्दल तक्रार अर्ज दिलेला आहे. दिलेल्या तक्रारीनुसार मला माहिती न मिळाल्यामुळे संबंधितांवर कलम ३१६(२), ३१६ (५), भारतीय न्याय संहितेनुसार अपहाराचा गुन्हा नोंद करण्याबद्दल तक्रार अर्ज दिलेला आहे. या बँकेचे कार्यालयाचे सुशोभीकरण व नूतनीकरण आणि फर्निचरचे काम करण्यात आले होते. या कामात अनावश्यक लाखो रुपयांची उधळपट्टी करून संस्थेच्या रक्कमा व बिलांच्या नावाखाली अपहार केले गेले असल्याचे समजल्यामुळे या झालेल्या कामाची माहिती दाखवण्यात आली नाही. म्हणून मी झालेल्या कथीत अपहाराची खात्री करण्यासाठी संस्थेकडून कामाची विगतवारी व तपशिलवार व टेंडरची माहिती लेखी पुरविण्याबद्दल लेखी अर्ज देवून देखील अद्याप पावेतो माहिती मिळालेली नाही. बँकेचा संचालक असून मला माहिती देणे बंधनकारक असतानाही अद्याप पावेतो ती दिलेली नाही. उलट सुशोभीकरण व फर्निचरच्या कामाचे अपहार दाबण्याकरीता वार्षिक सर्वसाधारण सभेपुढील विषय क्र.३ संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन २०२५-२६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्विकृत करणे. तसेच मागील वर्षात अंदाज पत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे. तसेच विषय क्र. ८ बँक नूतनीकरण कामी झालेल्या खर्चाची नोंद घेऊन त्यास कार्योत्तर मंजुरी देणे हे विषय घेण्यात आलेले आहेत. जेणे करून अपहार करणाऱ्यांना या प्रकरणातून निसटता यावे म्हणून हे विषय वार्षिक सभेपुढे घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणून माझी वर नमूद वार्षिक सभेपुढे ठेवलेले विषय क्र.३ मधील अंदाज पत्रकापेक्षा जास्त झालेल्या खर्चा मध्ये बँक नुतनीकरणाचा खर्च घेतल्यास त्यास माझी सक्त हरकत आहे. तसेच विषय क्र.८ मध्ये देखील बँक नूतनीकरण बाबत झालेल्या खर्चाची नोंद घेण्याबद्दल देखील माझी सक्त हरकत आहे. तसेच आज होणाऱ्या वार्षिक सभेपुढे बँक नुतनीकरण कामी झालेले सर्व खर्च संबंधी बिले, व्हाऊचर व टेंडर व लागलेले सर्वागोष्टी संबंधी माहिती सर्व सभासदांसमोर दाखवण्यात या.वी कारण माझ्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मला अद्याप माहिती पुरवण्यात आलेली नाही. म्हणून मला समजलेली अपहाराची शंका बळावलेली आहे. म्हणून अपहार करणाऱ्यांविरूध्द कलम ३१६ (२) व ३१६ (५) भा. न्याय. संहिता खाली संबंधित अपहार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करावी व विषय क्र.३ व ८ वार्षीक सभेपुढे येऊ नये म्हणून माझी सक्त हरकत असून या सभेमध्ये नूतनीकरणाचा झालेला ३१ मार्च २०२५ पर्यंतचा खर्च मंजूर करीत आहे, अशी पळवाट शोधून मंजुरीच्या केलेल्या प्रयत्नाला देखील मी हरकत घेतली असल्याचे भरतकुमार ललवाणी यांनी म्हटले आहे.

 

भरत ललवाणी यांचे आरोप वैयक्तिक

 

अमळनेरची आर्थिक जीवनदायीनी असलेल्या अर्बन बँकेवर अनेक कर्मचाऱ्यांचे  कुटुंब अवलंबून आहे. हजारो सभासदांचा विश्वास बँकेवर असून मागील ९९ वर्षाच्या काळातील सर्वाधिक उत्कृष्ट कामकाज या वर्षात संचालक मंडळाने केलेले आहे. बँक सामूहिक निर्णय व नेतृत्वातून चालते. तक्रारदार संचालक ललवाणी यांनी सर्व व्यवहाराशी संबंधित ठराव मंजुरीत उपस्थिती दिली आहे. त्यावेळी त्यांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही. बँकेचे व्यवहार पारदर्शक असून आजपर्यंत जे बील अदा झाली ती संचालक मंडळाच्या एकमताने व मंजुरीने अदा झालेली आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा अपहार नाही. ज्या बिलांबद्दल आक्षेप आहेत ते बिल अदा केलेले नाही. त्यामुळे तक्रारदार संचालक भरत ललवाणी यांचे आरोप वैयक्तिक असून त्यांनी बँकेचे हित डोळ्यासमोर ठेवावे. त्यांच्या सर्व मुद्द्यावर संचालक मंडळ सकारात्मक असल्याचे जनरल सभेत जाहीर केलेले आहे.

पंकज मुंदडा, चेअरमन व रणजित शिंदे, व्हॉईस चेअरमन

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *