अंगारक चतुर्थी निमित्ताने श्री मंगळ ग्रह मंदिरात भाविकांची अलोट गर्दी
अमळनेर (प्रतिनिधी) अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यामुळे मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप आले होते.
श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. मंगळवारी चतुर्थी आल्यास त्यास अंगारक योग म्हणतात. अंगारकीचा योग्य वर्षातून एक ते दोनदाच येतो. यावेळी श्रावणात अंगारकी योग आल्याने त्यास विशेष धार्मिक महत्त्व आहे. १२ रोजीचा हा या वर्षाचा पहिलाच योग होता. त्यामुळे या योगाचा लाभ घेण्यासाठी देशभरातील भाविकांनी येथील मंगळग्रह मंदिरात येऊन दर्शन, अभिषेक-शांती व वैशिष्ट्यपूर्ण महाप्रसादाचा लाभ घेतला. पहाटे पाच वाजता धुळ्याचे अनिल रामेश्वर अग्रवाल पंचामृत अभिषेकाचे मानकरी होते. त्यांनी मंगळग्रह देवतेची मुख्य व उत्सव मूर्तीवर पंचामृत अभिषेक केला. अशी मान्यता आहे की, अंगारकीला ब्रम्हांडातील मंगळ ग्रहाच्या पुण्य लहरी कैक सहस्र पटीने पृथ्वी कडे आकर्षित होत असतात. त्यामुळे अंगारकी चतुर्थीचे व्रत तथा उपवास करणाऱ्यांना त्या पुण्यलहरींचा लाभ मिळतो. संकष्टीचा अर्थ दुःखाचा पराभव करणारा असा होतो.
दरम्यान आज भाविकांची अलोट गर्दी होईल याचा मंगळ ग्रह सेवा संस्थेला पूर्व अंदाज होताच त्यामुळे संस्थेने भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या सोयी – सुविधांची वाढीव तजवीज केलेली होती. त्यामुळे खूप गर्दी होऊनही कोठेही धक्काबुक्की, अस्ताव्यवस्था, अस्वच्छता आदी कोणताही प्रकार झाला नाही. उपवासाचा व नेहमीचा महाप्रसादही वाढीव प्रमाणात केल्याने सायंकाळपर्यंत सर्व भाविकांना त्याचा लाभ घेता आला. सर्वांसाठी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदींची मुबलक व्यवस्था केलेली होती. मंगल सेवेकरी व सिक्युरिटीची संख्याही वाढवण्यात आली होती. त्यामुळे सारे काही निर्विघ्न पार पडले. खूप मोठ्या प्रमाणावर अभिषेक व शांती पूजाही झाल्या.