सोनगीरच्या टोल माफीचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर तालुक्यातील सोनगीर टोलनाक्यापासून वीस किलोमीटरच्या आत येणाऱ्या गावांच्या चारचाकी वाहनधारकांना टोल माफी न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
धुळे शहर जवळ असल्यामुळे मांडळ, कंचनपूर, वालखेडा, डोंगरगाव, मुडी, वाघाडी या गावांतील नागरिकांना नोकरी, शिक्षण, आरोग्य, खरेदी अशा विविध कामांसाठी रोज अथवा एक दिवसाआड धुळे जावे लागते. दरवेळी टोल भरण्याचा आर्थिक बोजा सर्वसामान्यांवर पडत असून, टोल माफीची मागणी दिवसेंदिवस जोर धरत आहे. या परिसरातून दररोज शंभर ते सव्वाशे चारचाकी वाहने सोनगीर टोलनाका पार करतात. संबंधित गावांच्या ग्रामपंचायतींनी याबाबत लेखी ठराव सादर केला आहे. तरीही अद्याप निर्णय न झाल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. वाहनधारकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, संबंधित टोल व्यवस्थापन व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने टोल माफीचा निर्णय घ्यावा, अन्यथा मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल.