वंदे भारत एक्सप्रेसला जळगाव रेल्वे स्थानकवर मिळाला थांबा
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कडे खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश
अमळनेर (प्रतिनिधी) अजनी (नागपूर) ते पुणे नवीन सुरु होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला जळगाव स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. हा निर्णय उत्तर महाराष्ट्रासाठी अत्यंत आनंदाचा आहे.
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल खासदार स्मिता उदय वाघ यांनी नवी दिल्ली येथे रेल्वे, माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील लाखो नागरिकांना वेगवान, आधुनिक आणि आरामदायक १२ तासात पुणे ते नागपूर रेल्वेचा प्रवासचा लाभ मिळणार आहे. विशेषतः पुणे आणि नागपूरसारख्या प्रमुख शहरांशी जळगावकरांचे थेट, जलद आणि दर्जेदार रेल्वे कनेक्टिव्हिटी सुलभ होणार आहे. खासदार वाघ यांनी यापूर्वी रेल्वे मंत्रालयाच्या बैठकीत जळगावसाठी वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर या मागणीस यश आले असून, १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या शुभारंभानंतर वंदे भारत एक्सप्रेस जळगाव स्थानकावर थांबणार आहे. या भेटीत जळगाव आणि खान्देश परिसरातील इतर रेल्वे प्रकल्पांबाबतही चर्चा झाली असून, रेल्वे मंत्रालयाकडून सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.