मुख्य डाकघराचे सर्वर डाऊनमुळे लाडक्या बहिणींना राख्या पाठवण्यास अडथळा

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील एकमेव मुख्य डाकघराचे सर्वर गेल्या पंधरा दिवसापासून डाऊन असल्यामुळे लाडक्या बहिणींना रक्षाबंधन सणाला पोस्टाने आपल्या भावांना राखी पाठविण्यापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे.

अमळनेर शहराचा झपाट्याने विस्तार होत आहे. शहराची अंदाजीत सुमारे दीड लाख लोकसंख्या असून त्या अनुषंगाने शहरात दोन ते तीन उपडाक घर असणे आवश्यक असताना देखील एकच मुख्य डाकघर असून त्यात नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये बचत खाते, आर्वती ठेव योजना, मासिक प्राप्ती योजना, सुकन्या योजना, पीपीएफ, मुदत ठेव, वरिष्ठ नागरिक बचत योजना, किसान विकास पत्र, राष्ट्रीय बचत पत्र, पोस्टल लाइफ इन्शुरन्स, ग्रामीण डाक विमा तसेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या अंतर्गत मुख्यमंत्री लाडकी बहीण, पीएम किसान तसेच शासनाच्या घरकुल, शालेय विद्यार्थी स्कॉलरशिप इत्यादींसारख्या योजनांचे डीबीटी द्वारे प्रत्यक्ष लाभार्थीच्या खात्यात अनुदान जमा होणाऱ्या लाभार्थ्यांची बचत खाते मिळून मुख्य डाकघरात अंदाजीत 50 हजाराच्या वर खातेदार आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील ग्रामीण भागातील 30 शाखा डाक घरांचे सर्व कामकाज व मारवड, अमळगाव या उपडाक घरांना वित्तीय पुरवठा देखील मुख्य डाक घरातूनच केला जातो. 

शहरातील मुख्य डाक घरात रोज रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट, पार्सल, मनी ऑर्डर, पैसे काढणे व ठेवणे इत्यादी खातेदारांची कामे मोठ्या प्रमाणात असताना देखील सुमारे पंधरा दिवसापासून सर्वर डाऊनमुळे ज्येष्ठ नागरिक, महिला सह सर्व खातेदारांची महत्त्वाची कामे ठप्प पडली आहेत. त्यातच अजून भर पडली ती शनिवारी असलेल्या रक्षाबंधन सणानिमित्त पोस्टाने आपल्या भावांना स्पीड पोस्टाने राखी पाठविण्यासाठी येणाऱ्या महिला वर्गांची तसेच महिलांनी रोज फेऱ्या मारून देखील सर्वर डाऊनमुळे आता  दोन दिवसात भावाला राखी न पोहोचण्यामुळे या मुख्य डाकघराच्या भोंगळ कारभाराचा महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

 

दोन्ही उपडाक घरे केली बंद

 

शहरात पूर्वी लोकसंख्या कमी असताना देखील मुख्यडाक घराव्यतिरिक्त प्रताप नगर व अमळनेर टाऊन अशी 2 उपडाक घरे होती. मात्र जिल्ह्याच्या मुख्य डाक विभागातील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे व तालुक्यातील लोकप्रतिनिधींची उदासीनता या दोन्ही कारणांमुळे बारा ते पंधरा वर्षांपूर्वीच दोन्ही उपडाक घरे अन्य ठिकाणी स्थलांतरित करून बंद करण्यात आली आहेत. आता मात्र मात्र शहराची झपाट्याने वाढलेली लोकसंख्या पाहता स्थानिक खासदार, आमदार यांनी  जिल्हास्तरीय डाक विभागाशी पाठपुरावा करून दोन्ही उपडाकघरे शहरात पूर्ववत चालू करावी. अशी मागणी डाकघरातील सर्व त्रस्त खातेदारांनी केलेली असून त्याचबरोबर आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिलेला आहे.

 

यंत्रणा पूर्ववत होण्यास  सुरुवात

 

डाक विभागात पंधरा दिवसापासून आयटी 2.0 नवीन प्रणाली लोड झाल्यामुळे सेंट्रल सर्वर प्रॉब्लेम चालू आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा विस्कळीत झाली होती. आता मात्र सर्व यंत्रणा पूर्ववत होण्यास  सुरुवात झाली आहे. तरी सर्व खातेदारांनी सहकार्य करावे.

टी. एच.पाटील, पोस्ट मास्तर, मुख्य डाकघर, अमळनेर

 

आठ ते दहा दिवसापासून मारतेय फेऱ्या

 

मध्य प्रदेशातील बुरहानपुर माहेर असल्याने दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधनासाठी भावाला रजिस्टर पोस्टाने राखी पाठविण्यासाठी आठ ते दहा दिवसापासून फेऱ्या मारत आहे. रोज सर्वर डाऊन आहे. असे उत्तर कर्मचारी देत आहेत. आता मात्र मुख्य डाकघराच्या या भोंगळ कारभारामुळे दोन दिवसात भावाला राखी पोहोचणे शक्य नाही. याचे मनाला वाईट वाटत आहे.

 

विजया प्रकाश ताडे, गृहिणी, अमळनेर

 

पूर्वीची दोन्ही उप डाकघरे पूर्ववत सुरू करावी

 

शहरातील मुख्य डाक घरात नेहमीच गर्दी असते. कुठल्याही कामासाठी अर्धा ते एक तास रांगेत उभे राहावे लागते. तसेच मनुष्यबळ कमी असल्यामुळे बाकी काउंटर बंद असतात. पूर्वी वाडी चौकात असलेल्या उप डाकघरात त्वरित कामे होऊन जात होती. शहराची वाढलेली लोकसंख्या पाहता पूर्वीची दोन्ही उप डाकघरे पूर्ववत सुरू करावी. जेणेकरून लोकांची सोय होऊन वेळही वाचेल.

प्रा. टी. एच. बारी, ज्येष्ठ नागरिक, वाडी चौक, अमळनेर 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *