इंग्रजीचा सराव आणि सातत्य ठेवल्यास संवाद कौशल्यावर मिळवता येते प्रभुत्व : डॉ. झेड. एन. पाटील
अमळनेर (प्रतिनिधी) ग्रामीण भागातील विद्यार्थी मेहनती आहेत. त्यांनी आपल्या न्यूनगंडावर मात करीत इंग्रजी विषयाचा सराव आणि सातत्य ठेवल्यास संवाद कौशल्यावर प्रभुत्व मिळऊ शकतात, असे प्रतिपादन इंग्रजी विषयाचे भाषातज्ञ झेड. एन. पाटील यांनी केले.
धनदाई कला व विज्ञान महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामार्फत आयोजित संवाद कौशल्य कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. लिलाधर पाटील, उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील, प्रा. मीनाक्षी इंगोले उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. डॉ. झेड. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेत उच्चार, स्पेलिंग, लयबद्धता, टोन व त्याचे सादरीकरण कसे प्रभावी होऊ शकते याविषयी सखोल मार्गदर्शन केले. इंग्रजी सुधारविण्याच्या दृष्टीने विविध खेळ व प्रयोग त्यांनी उपस्थितांना समजावून सांगितले. आपल्या अध्यक्ष मनोगतात प्राचार्य डॉक्टर एच. एम. पाटील यांनी ही कार्यशाळा एक ज्ञानवर्धक अनुभव असल्याचे सांगून अशा अनुभवी व्यक्तींच्या परिसंस्पर्शाने जीवनाचे सोने होते असे सांगितले. प्रास्ताविकात डॉ. लीलाधर पाटील यांनी संवाद कौशल्याचे महत्त्व स्पष्ट करून डॉ. झेड. एन. पाटील हे अमळनेर तालुक्यातील देवळी या गावचे असून इंग्रजी वरील प्रभुत्वामुळे त्यांनी जगातील ३२ देशात मार्गदर्शन केले असून व्हिएतनाम व जपान येथे सहा वर्ष भारत सरकारच्या विदेश मंत्रालयातर्फे विशेष नियुक्त होऊन इंग्रजी भाषेचे मार्गदर्शक म्हणून कार्य केल्याचे सांगितले. कार्यशाळेसाठी डॉ. किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राहुल इंगळे, डॉ. प्रवीण पवार, डॉ. रमेश पावरा, डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. महादेव तोंडे, डॉ. शैलेश पाटील, प्रा. मेघना भावसार, डॉ. भगवान भालेराव, प्रा. रवींद्र चौधरी, शुभम पाटील, भाविका पाटील, जितेंद्र पवार, राजश्री चव्हाण यासह विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन इंग्रजी विभागातील प्रा. मीनाक्षी इंगोले यांनी केले.