अमळनेर तालुक्यात पीक प्रात्यक्षिकांना कृषी अधिकाऱ्यांनी भेट देऊन केली पाहणी
अमळनेर (प्रतिनिधी) राष्ट्रीय अन्नसुरक्षा आणि पोषण अभियान (कडधान्य प्रकल्प) अंतर्गत तालुक्यातील पातोंडा कृषी मंडळ परिसरातील पीक प्रात्यक्षिकांना कृषी अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. या वेळी उपसंचालक भरत इंगळे आणि तालुका कृषी अधिकारी अमळनेर चंद्रकांत ठाकरे उपस्थित होते.
रुंधाटी येथील तापी माता शेतकरी गटाच्या सदस्य वैशाली प्रवीण पाटील यांच्या शेतातील मुग पिकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानानुसार घेतलेल्या उपाययोजनांची आणि मृत सरीची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. या वेळी शेजारील शेतकरी राजेंद्र पंढरीनाथ पाटील यांच्या कापसाच्या शेतात फवारणी दरम्यान नजरचुकीने अतिशय कमी प्रमाणात तणनाशकाचा वापर झाल्याने झालेल्या अंशतः नुकसानीची नोंद अधिकाऱ्यांनी घेतली. तसेच तणनाशक वापरल्यानंतर रिकाम्या डब्यांची योग्य विल्हेवाट लावण्याचे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना करण्यात आले.
कंडारी खुर्द येथे तूर पिकाची पाहणी
कंडारी खुर्द येथील सुवर्णयुग शेतकरी गटाच्या शेतात तूर पिकाची पाहणी करण्यात आली. यावेळी टोकन पद्धतीने लागवड आणि योग्य वेळी शेंडे खुडणी केल्यास पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते, याचे मार्गदर्शन कृषी उपसंचालक इंगळे यांनी शेतकऱ्यांना केले. त्यांनी प्रकल्पाअंतर्गत वेळोवेळी प्राप्त झालेल्या निविष्ठांच्या वितरणाची व अंमलबजावणीची खात्री देखील घेतली.
महा डीबीटी पोर्टलवरील योजनांचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन इंगळे यांनी केले. या कार्यक्रमावेळी उपस्थित अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी पातोंडा सचिन वानखेडकर, उपकृषी अधिकारी प्रविण पाटील योगेश वंजारी, सहाय्यक कृषी अधिकारी अनिकेत सूर्यवंशी निलेश पाटील, चेतन चौधरी, शेतकरी गटाचे पदाधिकारी व सदस्य, अध्यक्ष विकास सुरेश पाटील, ज्ञानेश्वर रामभाऊ पाटील, सतिलाल रामभाऊ पाटील, सुभाष छगन पाटील, हिलाल माणिक पाटील, योगेश मधुकर पाटील, सागर राजेंद्र पाटील आणि इतर अनेक शेतकरी उपस्थित होते.