अमळनेर शहरात भटक्या कुत्र्यांनी मांडला उच्छाद, नागरिकांचे तोडताय लचके
अमळनेर (प्रतिनिधी) शहरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून लहान मुलांसह नागरिकांचे लचके तोडू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपायोजना करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील अनेक भागांत कुत्र्यांचे टोळके फिरताना दिसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः सकाळी शाळेत जाणारी मुले आणि सायंकाळी कामावरून घरी परतणारे नागरिक यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. आठ दिवसा पूर्वी गलवाडे रोडवर शुक्लाजी नमकीन यांच्या घराजवळ लहान मुले खेळत असताना पांच ते सहा कुत्रे मिळून लहान मुलांना घेरले. सुदैवाने लक्ष गेल्यावर इतर लोकांनी धावत जाऊन त्या कुत्र्यांना पळवून लावल्याने ती मुले बचावली.
तसेच दाजिबानगरमध्ये देखील असाच प्रकार घडला. कॉलनी परिसरात देखील कुत्र्यांनी अचानक सहा ते सात नागरिकांवर हल्ला चढवला. विशेष बाब म्हणजे यामध्ये काही लहान मुलेही किरकोळ जखमी झाली आहेत. खायला मिळत नसल्याने याचा परिणाम भटक्या कुत्र्यांवर झाला असून, नेहमी दुकानांजवळ मिळणारे अन्न बंद झाल्याने ते उपाशी राहून आक्रमक झाले असल्याचे सांगण्यात येत आहे.
बाहेर गावातून कुत्रे सोडल्याचा संशय
बाहेर गावातून अमळनेर शहरामध्ये कुत्रे आणून सोडले जातात. यामुळेच संख्या वाढत असल्याची चर्चा आहे. अमळनेर नगरपरिषदेने याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई केली नसल्यामुळे नागरिकांत नाराजीचा सूर आहे. तरी “नगर परिषदेने या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिकांनी केली आहे.
शाळकरी मुलांचा जीव धोक्यात
कुत्र्यांचा उपद्रव विशेषतः शाळकरी मुलांसाठी धोकादायक ठरत असून, काही पालकांनी आपल्या मुलांना एकटे शाळेत पाठवणेही टाळले आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत कुत्र्यांची संख्याही अधिक असते, त्यामुळे पालकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.
प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक
ही समस्या केवळ कुत्र्यांच्या आक्रमकतेपुरती मर्यादित नाही, तर ही एक सार्वजनिक आरोग्याची आणि सुरक्षिततेची गंभीर बाब आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत, कुत्र्यांचे निर्बंध, जनजागृती आणि तातडीच्या उपाययोजनांसाठी पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी होत आहे.