उत्कृष्ट पोलिस पाटील पुरस्काराने ब्राह्मणे येथील गणेश भामरे सन्मानित

अमळनेर(प्रतिनिधी) चोपडा येथे महसूल सप्ताह अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील ब्राह्मणे येथील गणेश भामरे पाटील यांचा प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांच्या हस्ते उत्कृष्ट पोलिस पाटील म्हणून गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाच्या वेळी अमळनेरचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, चोपडा तहसीलदार भाऊसाहेब थोरात, नायब तहसीलदार प्रशांत धमके, अजय कुलकर्णी, डी.आर. सौंदाणे, आर.आर ढोले यांच्यासह अमळनेर प्रांत कार्यालय अंतर्गत सर्व अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, क्लार्क, ग्राम महसूल सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश भामरे यांनी बाम्हणे परिसरातील वाळू चोरी रोखण्यासाठी विविध उपाययोजना करत कर्तव्य पार पाडले असून बाम्हणे फाट्यावर लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी धुळे – जळगाव जिल्ह्याच्या तपासणी नाक्यावर ग्रामस्थांच्या मदतीने महत्वपूर्ण भूमिका पार पाडली. गावात निर्माण झालेल्या तणावाच्या विविध प्रसंगी सामंजस्याची भूमिका घेत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवली. यामुळे बाम्हणे गावाने तंटामुक्त गाव म्हणून जिल्हास्तरीय २ रा क्रमांक पटकाविला. निवडणूक काळात गावात आदर्श मतदान केंद्र तयार केले.

गावातील ग्रामस्थांची सुरक्षितता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी १८ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यांनी सामाजिक कामासोबतच सहकाराला बळकट करण्यासाठी गावातील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची धुरा देखील यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या गौरवाबद्दल माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिताताई वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील तसेच सामाजिक व राजकीय स्तरातून स्वागत होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *