कन्हेरे येथील कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात पाणी साचल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला आले उधान
अमळनेर (प्रतिनिधी) आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तालुक्यातील कन्हेरे येथे कोल्हापूर टाईप बंधाऱ्यात रिचार्ज पिट पद्धतीने सिंचन क्षमता वाढवण्यात येणार आहे. या बंधाऱ्यात प्रथमच पाणी साचल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. काहींनी तर पाण्यात डुबक्या मारून पोहण्याचा देखील आनंद लुटला.
कन्हेरे – फापोरे गावांना जोडणाऱ्या बोरी नदीवरील पुलाच्या खाली आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत सहा कोटी रुपये खर्चून कोल्हापूर टाईप बंधारा बांधण्यात आला आहे. बंधाऱ्याला २९ खिडक्या आहेत. रिचार्ज पिट पद्धतीने या बंधाऱ्यात नदी पात्रात १०० फुटाचे बोअर करून जमिनीत पाणी सिंचन करण्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे. नुकतेच त्याचे काम पूर्ण झाले आहे. बोरी नदीला थोडेफार पाणी आल्याने या बंधाऱ्यात पाणी अडवले जाऊन बंधारा पूर्ण भरला आहे. पाण्याचा साठा झाल्याने परिसरात सिंचन क्षमता वाढणार आहे. त्याचप्रमाणे विहिरींची भूजल पातळी वाढेल. शेतीला लाभ होण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटणार आहे. यामुळे ग्रामस्थांनी बंधाऱ्याकडे धाव घेऊन आनंद व्यक्त केला. यावेळी अरुण पाटील, संतोष पाटील, महारु पाटील, रवींद्र पाटील, धनराज पाटील, जयराम पाटील, विरभान पाटील, संजय पाटील, रवींद्र पाटील, दिनकर पाटील, अरूण सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील, सोमनाथ पाटील उपस्थित होते.