पाडसे येथे महिलेचा विनयभंग करून पती व सासऱ्याला मारहाण
अमळनेर (प्रतिनिधी) खड्डा खोदण्यावरून भांडण झाल्याने महिलेचा विनयभंग करून दोघांना मारहाण केल्याची घटना तालुक्यातील पाडसे येथे घडली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबबात अधिक माहिती अशी की, ३५ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, तिचे सासरे सोसायटीचे डायरेक्टर असून २ रोजी सोसायटीच्या जागेच्या बाजूला खड्डे खोदणाऱ्या देवराम बाबुराव कोळी, सागर देवराम कोळी, अशोक बाबुराव कोळी यांना मज्जाव केला असता त्यांनी महिलेच्या सासऱ्याला शिवीगाळ व मारहाण केली. गावातील लोकांनी ते भांडण मिटविले. त्याच रात्री गावात तमाशाचा कार्यक्रम असल्याने महिलेचे पती तमाशा पाहायला गेले होते. रात्री ९:३० वाजता महिला घरी एकटी असताना सागर देवराम कोळी हा घरात घुसून आला. व तू दुपारी जास्त आवाज करत होती असे म्हणत महिलेला अंगावर ओढून लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्यामुळे महिलेने घाबरून आरडाओरड केल्याने तिची सासू घरात आल्याने सागर कोळी पळून गेला. त्यानंतर सदर महिलेच्या पती जाब विचारण्यासाठी सागर कोळीकडे गेले असता देवराम बाबुराव कोळी, सागर देवराम कोळी, अशोक बाबुराव कोळी यांनी महिलेच्या पतीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच कोणालाच जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. महिलेच्या फिर्यादीवरून मारवड पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास हेकॉ संजय सूर्यवंशी हे करीत आहेत.