चोरट्यांनी माजी आमदार साहेबराव पाटलांचे फोडले घर, ३५ मिनिटात ३४ लाखांचा ऐवज नेला लुटून

अमळनेर (प्रतिनिधी) माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या पारोळा तालुक्यातील राजवड येथील बंगल्याचे चार चोरट्यानी कुलूप तोडून अवघ्या ३५ मिनिटात ३४ लाखांचा ऐवज लुटून नेला. यात २४ लाख रुपयांचे ७०० ग्राम सोने व  १० लाख रुपये रोकडचा समावेश आहे. ही घटना २ रोजी पहाटे दोन ते चार वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, माजी आमदार साहेबराव पाटील गेल्या २७ जुलैपासून कुटुंबासह आपल्या मुलाकडे नाशिक येथे गेलेले होते. त्यांच्या घरामागील अरुण पाटील यांनी सकाळी त्यांच्या नातूला कळवले की घराचे कुलूप तोडलेले आहे.  त्यांच्या नातेवाईकांनी प्राथमिक पाहणी केली असता त्यांना घराच्या सर्व दरवाजाचे कुलूप तोडलेले तसेच कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. त्यांनी साहेबराव पाटलांशी संपर्क साधला. त्यांनी डीवायएसपी विनायक कोते,  पारोळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप याना कळवले. दुपारी दीड वाजेच्या सुमारास माजी आमदार साहेबराव पाटील राजवड पोहचले. चोरट्यानी घरातील कपाट आणि बेड उचकावून साहित्य अस्ताव्यस्त केलेले दिसले. याबाबत निलेश उर्फ बाळा अशोक पाटील यांनी फिर्याद दिल्यावरून पारोळा पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

चोरट्यांनी चोरून नेलेला ऐवज असा

 

चोरट्यानी घरातील ९ लाख रुपये किमतीच्या ३०० ग्राम सोन्याच्या मंगल पोत, ७ लाख रुपये किमतीच्या २०० ग्राम १६ सोन्याच्या अंगठ्या, ८ लाख रुपये किमतीच्या २०० ग्राम ३ सोन्याचे नेकलेस तसेच १० लाख रुपये रोख आणि ८ हजार रुपये किमतीचे डिव्हीआर असा एकूण ३४ लाख ८ हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे.

 

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

 

एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चार चोरटे धरणगाव रस्त्याकडून सागाच्या झाडांमधून साहेबराव पाटलांच्या बंगल्याकडे आले आणि कम्पाउंडची भिंतीवरून  घरात प्रवेश केला. २ रोजी पहाटे २:३९ मिनिटांनी घरात प्रवेश करून ३:१४ मिनिटांनी म्हणजे ३५ मिनिटात चोरी करून बाहेर पडले.

 

पोलिसांचा ताफा, श्वान पथक दाखल

 

डीवायएसपी विनायक कोते,  एलसीबी पोलिस निरीक्षक  संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वलटे, पोलीस निरीक्षक सचिन सानप, एपीआय योगेश महाजन, हेडकॉन्स्टेबल कैलास साळुंखे  यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. तसेच श्वान पथक, फॉरेन्सिक पथक, ठसे  तज्ज्ञ याना बोलावून नमुने घेतले. चोरट्यांचा मागोवा घेतला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *