देशमुख नगरातील जुनी जलवाहिनी फुटली; गढूळ पाणी पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील देशमुख नगर परिसरात नवी पाणीपुरवठा लाईन टाकतांना जुनी जलवाहिनी फुटल्याने शेकडो लिटर पिण्याच्या पाण्याची नासाडी झाली. तर गढूळ पाण्याचा पुरवठा होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरात गेल्या काही महिन्यांपासून देशमुख नगर परिसरात भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झाले. त्यानंतर लगेचच २४x७ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले. मात्र, हे काम सुरू असतानाच जलवाहिनी फुटल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आणि रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले. या गटातील अनेक रस्ते चिखलमय झाले असून पादचाऱ्यांना तसेच वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या गटातील नागरिक गेल्या ८ दिवसांपासून अस्वच्छतेचा व घाण पाण्याचा त्रास सहन करत आहेत. तसेच खड्डे खोदून ठेवले आहेत. यात खड्ड्यात पडून एखादा अपघात होऊ शकतो. दुरुस्तीच्या कामामुळे रस्त्यावर खोदकाम झाले असून ते अद्यापही व्यवस्थित बुजवले गेलेले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी खड्डे व चिखल आहे. जलवाहिनी फुटल्यानंतरही संबंधित यंत्रणेने तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, अशी तक्रार स्थानिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे, नागरिकांच्या घरी गढूळ पाणी पोहोचत असल्याने पोटदुखी, जुलाब, उलटीसारख्या पाणीजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आरोग्यविषयक समस्या ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जोडणी झाली की नाही, यावरही प्रश्नचिन्ह
फुटलेली जलवाहिनी ही मुख्य जलवाहिनी होती की केवळ टाकण्यात येणाऱ्या नवीन लाईनची जमीन कोरणी सुरू होती, याबाबत प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
तातडीने जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करावी
स्थानिक नागरिकांनी तातडीने जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करावी, पाण्याचा स्वच्छ पुरवठा सुरळीत करावा तसेच रस्त्यांवर साचलेला चिखल आणि घाण झटकन साफ करून रस्त्याची डागडुजी करावी.
– डॉ. उमेश सोनवणे
ठेकेदाराला सांगून व्यवस्थित जोडणी करायला सांगतो
याबाबत संबंधित ठेकेदाराला सांगून व्यवस्थित जोडणी करायला सांगतो. पुन्हा पाणीपुरवठा चांगला होईल. यादृष्टीने त्यांना माहिती देतो व दीर्घकाळ पाणी पुरवठा सुरू राहील. रस्ता व्यवस्थित करायला लावतो.
– प्रवीण बैसाने, पाणीपुरवठा अभियंता नगरपालिका.