स्थानिक कलाकारांच्या सुमधुर गीतांनी जिंकली श्रोत्यांची मने
सूर-संगम म्युझिकल ग्रुपतर्फे स्व.मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम
अमळनेर (प्रतिनिधी) फलसका प्यार का तुम क्या जानो… तारीफ करू क्या उसकी… रुक जा ये हवा… पल पल दिलके पास अशा एकापेक्षा एक सरस गीतांचे सादरीकरण करून स्व.मोहम्मद रफी यांना पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
अमळनेर भूमीतील गायकांनी एका पेक्षा एक सुरेल गीत सादर करून उपस्थित श्रोत्यांची मने जिंकली. यामाध्यमातून स्व.रफिजीना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सुनिल वाघ प्रस्तुत सूर-संगम म्युझिकल ग्रुपतर्फे सुमधुर अशा नव्या व जुन्या अजरामर हिंदी गीतांचा कार्यक्रम “दिल की आवाज”चे आयोजन दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात करण्यात आले होते. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते स्व.रफी यांच्या प्रतिमेचे पूजन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे वैशिट्य म्हणजे यात खास करून स्थानिक गायक कलाकारांना संधी देण्यात आली होती. विशेष म्हणजे यात काही नवोदित गायकांनी पहिल्यांदाच मोठ्या मंचावर गीत सादर करून उपस्थितांची वाहवाह मिळवली. यावेळी प्रामुख्याने ऑर्गनायझर सिंगर सुनिल वाघ यांच्यासह सिंगर उज्वल पाटील, अनिल वानखेडे, सुनिल भोई,सौ सुनीता मोरे, श्याम संदानशिव, सुनंदा चव्हाण, शिवानी वाघ यांनी अनेक सुरेल गीत सादर केली. गायकांना प्रोत्साहन म्हणून अनेकांनी बक्षिसाची लयलूट केली. आयोजक सुनिल वाघ व त्यांची कन्या शिवानी वाघ या दोघांच्या गीतांना विशेष दाद मिळाली तर निवेदिका अँकर म्हणून पूजा शाह व सिकंदर यांनी प्रत्येक गाण्याचे सविस्तर विश्लेषण करून कार्यकमात खूपच रंगत आणली. साऊंड अरेंजमेंट म्हणून विजय शुक्ला व इतर कलाकारांनी साथसंगत दिली. कार्यक्रमासाठी विशेष मदत करणाऱ्या डॉ. मनीषा भावे, डॉ. मनीषा पाटील, माधुरी पाटील, के. डी. पाटील व पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला व पुरुष बांधव उपस्थित होते.