ड्युटीवरील होमगार्डला मारहाण करणे एकाला पडले महागात, तीन महिने सश्रम कारावासाची ठोठावली शिक्षा
अमळनेर (प्रतिनिधी) ड्युटीवरील होमगार्डला मारहाण करणे एकाला चांगलेच महागात पडले. न्यायालयाने त्याला तीन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी ईस्माईल जहुर पठाण उर्फ ईस्माईल खड्डा, (वय 29 रा. पानखिडकी, जिनगर गल्ली, अमळनेर) याने शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या होमगार्ड जवळ येवुन म्हणाला की, तु कोण? तु हा पोलीसांचा ड्रेस का घातला ? तु खरोखरच पोलीस आहेस का ? तुझे आयकार्ड दाखव असे बोलुन अंगावर धावून होमगार्डच्या उजव्या कानशिलात मारुन खाकी ड्रेसचे शर्टाची कॉलर पकडून ओढाताण केली. तसेच अरेरावीची भाषा करुन हुज्जत घालुन त्यांच्या सोबत असलेले पोना ललीत पाटील यांचीही शर्टाची कॉलर पकडुन मारहाणीकरता हातवारे करुन अंगावर धावुन आला. त्यामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून ईस्माईल जहुर पठाण विरुध्द भा.द.वि. कलम 353, 332. 504 प्रमाणे दोषारोप दाखल केला होता.
सदरचा खटला अति. जिल्हा न्यायाधीश एल. डी. गायकवाड यांच्यापुढे सदरच्या खटल्याचे कामकाज चालले. त्यात सरकारी वकील ॲड. के. आर. बागुल यांनी एकूण 6 साक्षीदार तपासले. आरोपी इस्माईल जहुर पठाण उर्फ इस्माईल खड्डा यास भा. द. वि कलम 353 प्रमाणे 3 महिने व 2000 रु दंड भा. द. वि. कलम 332 प्रमाणे 3 महिने व 1000 रु दंड सुनावण्यात आला. सदरील कामकाजात पो.हे.कॉ. पुरुषोत्तम वाल्डे, पैरवी अधिकारी पी. एस. आय उदयसिंग सांळुके पो.कॉ. राहुल रणधीर, पो.हे. कॉ. प्रमोद पाटील, पो.कॉ. भरत इशी, पो.कॉ. सतीष भोई यांचे सहकार्य लाभले.