कोविडनंतर बदललेल्या रेल्वे गाड्यांची वेळ पूर्ववत करा : खासदार स्मिता वाघ

अमळनेर (प्रतिनिधी) कोविडनंतर बदललेली रेल्वे गाड्यांची वेळ अनेक प्रवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करत असल्याचे अधोरेखित करीत रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करण्याची ठाम मागणी खासदार स्मिता वाघ यांनी  लोकसभेत करून हजारो प्रवाशांना होणाऱ्या त्रासाला वाचा फोडली आहे.

खासदार वाघ यांनी विशेषतः सुरत-भुसावळ एक्सप्रेस (गाडी क्र.19005) बाबत आवाज उठवला. ही गाडी पूर्वी उधना स्थानकावरून रात्री ११:२७ वाजता सुटून, सकाळी ८:४५ वाजता जळगावला पोहोचत होती, मात्र सध्याच्या वेळेनुसार ती सकाळी ७:०० वाजता जळगाव येथे पोहोचते. परिणामी प्रवाशांना रात्री ३ वाजता उठून प्रवास करावा लागतो. या बदलामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी वर्ग व महिला प्रवाशांवर मानसिक, शारीरिक व आर्थिक ताण येत आहे, असा मुद्दा त्यांनी मांडला. त्याचप्रमाणे, देवलाली-भुसावळ एक्सप्रेस (गाडी क्र. 11113)  ही पूर्वी चाळीसगावला सकाळी ७:४० व पाचोऱ्याला सकाळी ८:३० वाजता पोहोचत होती, पण सध्याच्या वेळेत झालेल्या बदलामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खासदार वाघ यांच्या मते, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ या भागांतील सुमारे ५,००० पेक्षा अधिक प्रवासी, विद्यार्थी, महिला, नोकरदार, व्यापारी व ज्येष्ठ नागरिकांना यामुळे दररोज अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या गाड्यांचे वेळापत्रक पूर्ववत करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी त्यांनी मागणी केली. ही मागणी फक्त वेळेच्या सोयीसाठी नाही, तर सामाजिक न्याय व प्रवाशांच्या मूलभूत हक्कांसाठी आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाकडे तातडीने पावले उचलण्याचे आवाहन केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *