
अमळनेर (प्रतिनिधी) केटी वेयर बंधाऱ्यांच्या नित्कृष्ट कामामुळे शेतजमीन कोरली जाऊन शेतीचे नुकसान झाल्याची तक्रार तालुक्यातील रामेश्वर येथील शेतकऱ्यांनी लेखी निवेदनाद्वारे महसूल विभागाकडे केली आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, तालुक्यातील रामेश्वर खुर्द येथील छबिलाल कौतिक पाटील व लक्ष्मण कौतिक पाटील यांची रामेश्वर बुद्रुक शिवारात शेती असून शेतीच्या बाजूला चिखली नदीवर केटी वेयर बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र बंधाऱ्याचे काम नित्कृष्ट पद्धतीचे झाल्याने पाण्याचा प्रवाह शेताकडे वळून शेतातील माती खरडून माती वाहून गेली आहे. त्यामुळे संपूर्ण शेतीचे नुकसान झाले असून सदर ठेकदारावर कारवाई करण्यात येऊन बंधाऱ्याची दुरुस्ती करावी. तसेच शेतीच्या नुकसानीबाबत पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देतेवेळी छबिलाल पाटील, लक्ष्मण पाटील, बाजार समिती संचालक भोजमल पाटील आदी उपस्थित होते.