अमळनेरात ज्येष्ठ नागरिकांचा आज रंगणार आनंद महोत्सव
१२५ ते १५० ज्येष्ठ नागरिक सादर करणार कलागुण
अमळनेर (प्रतिनिधी) गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून उतारवयात कोमेजलेल्या आयुष्याला काही क्षण का असेना नवी पालवी फुलून जीवन जगण्यासाठी नवी उमेद मिळावी यासाठी ६ आॅगस्ट रोजी ज्येष्ठ नागरिकांचा आनंद महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. मराठा मंगल कार्यालयात सकाळी १० वाजता हा महोत्सव साजरा होणार आहे. यात सुमारे १२५ ते १५० ज्येष्ठ नागरिक आपल्यातील कलागुण सादर करणार आहेत. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असणार आहे.
बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात नैराश्य, एकाकीपणा, नकारात्मकता येत असते. शिवाय अख्खे आयुष्य कर्तव्य निभावताना इच्छा असूनही आपल्यातील कलागुणांना सादर करण्यास संधी मिळत नाही. शेवटी निवृत्त होऊन घरी एकाकी जीवन जगावे लागते. गटविकास अधिकारी एन. आर. पाटील यांनी नाउमेद झालेल्या अशा ज्येष्ठ नागरिकांना आपल्यातील सुप्त कलागुणांना सादर करण्याची संधी उपलब्ध कुरुन दिली आहे.
सकारात्मक जीवन जगण्याची मिळेल उमेद
या प्रयोगामुळे निराश, हतबल झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा काही तास का असेना मोठा विरंगुळा होणार आहे. त्यातून त्यांना सकारात्मक जीवन जगण्याची उमेदही मिळू शकते. यातून काहीजणांच्या आयुष्यात थोडाफार जरी चांगला परिणाम झाला तर मला आनंदच होईल.
–एन. आर. पाटील. गटविकास अधिकारी, पंचायत समिती अमळनेर