गांधलीपुरा भागात डिपीवरील ओव्हरलोडमुळे वारंवार वीजपुरवठा खंडितने नागरिक वैतागले
अमळनेर (प्रतिनिधी) गांधलीपुरा येथील जुनी डिपीवर सतत ओव्हरलोड होत असल्याने या परिसरातील वीजपुरवठा सकाळ-संध्याकाळ नियमितपणे खंडित होते. विशेष म्हणजे नळाला पाणी आल्यावर वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठे हाल सोसावे लागत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी नागरिकाना महावितरण कंपनीला निवेदन दिले.
अल्लामा फजले हक खैराबादी (रह.) स्टडी सेंटर व पब्लिक लायब्ररीजवळ ही डिपी आहे. त्यावर पडणाऱ्या लोडमुळे सततच्या वीज खंडिततेमुळे नागरिक त्रस्त झाले असून, वारंवार वायरमॅनच्या मदतीने लाईन सुरू केली जाते. मात्र काही वेळातच लाईन पुन्हा बंद होते. त्यामुळे पाणी भरण्याचे वेळापत्रक कोलमडत असून, नागरिकांना पाण्यासाठी इतर ठिकाणी धावपळ करावी लागत आहे.
जुनी डिपी बदलून त्या ठिकाणी अधिक क्षमतेची नवीन डिपी लावण्यात यावी, जेणेकरून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत राहील आणि पाणीपुरवठ्यावर होणारा परिणाम टाळता येईल, अशी मागणी नागरिकांनी या वेळी केली. या समस्येची तात्काळ सोडवणुकीसाठी गांधलीपुरा परिसरातील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते मौलाना रियाज शेख यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या अमळनेर शहर कक्ष १ येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता टिकाराम हरी नेमाडे यांना निवेदन दिले. या वेळी अ. गफ्फार खाटीक, सामाजिक कार्यकर्ता मनोज मोरे, साहाबोद्दीन शेख, फारुख खाटीक, अकबर भाई, सिकंदर पेंटर, शाहीद मुजावर, राहील पठान, नेरकर अप्पा, युसूफ खन्ना यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होेते.