खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

स्पर्धात्मक युगात आंतरभारती काळाची गरज ः वक्त्यांचा सुर

खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात आंतरभारती काल आज-उद्यावर परिसंवाद

 

अमळनेर (प्रतिनिधी) साने गुरुजी यांनी विद्यार्थ्यांसाठी मूल्यशिक्षणासाठी उपक्रम राबविले. आंतरभारतीच्या माध्यमातून विद्यार्थ्याना अनेक भाषाा शिकण्याची संधी दिली. आजच्या स्पर्धात्मक युगात त्यांच्या आंतरभारतीची आवश्यकता असल्याचा सुर आंतरभारती काल आज-उद्या या परिसंवदात उमटला.

 साहित्य संमेलनातील खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी सभागृहात झालेल्या या परिसंवादाच्या अध्यक्ष्ापदी डॉ. सुभाष किन्होळकर (धामणगाव बडे) हे होते. यात युवराज मोहिते (गोरेगाव), अमर हबीब( अंबाजोगाई), चंद्रकात भोंजाळ (अंधेरी), जयेश म्हाळगी (वडोदरा), डॉ. अलका कुलकर्णी (शहादा) यांनी सहभाग घेतला.

डॉ. अलका कुलकर्णी म्हणाल्या की, भारतीय खंड हा बहुभाषिक, बहुप्रांतीय, बहुसांस्कृतीक होता.  त्यांचा बंधूभाव हाच धर्म होता. साने गुरुजी यांनी १९२४ साली मुलांसाठी दैनिक काढल्यानंतर दीड वर्षांनी मुलांसाठी मासिक काढले. विद्यार्थ्यांना मूल्य शिकविण्याचे उपक्रम राबविले. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गावाचा इतिहास शोधण्याचा सल्ला दिला. यातून त्यांनी स्थानिक प्रथा, परंपरा, इतिहास यामागील कारणमिमांसा केल्यास शेतकऱ्यांबद्दल बंधूभाव निर्माण होईल अशी गुरुजींची भूमिका होती. आंतरभारती संस्थेचे महत्त्व विशद केले. विद्यार्थ्यांना अनेक भाषा शिकण्याची संधी मिळाली. १७ मे १९५० साली साधनाच्या अंकांत आंतरभारतीची कल्पना मांडली व त्यासंदर्भांचा ठराव साहित्य संमेलनात पास करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

भाषावर प्रांत रचना ही दुधारी तलवार

 

युवराज मोहिते म्हणाले की, भाषावर प्रांत रचना ही दुधारी तलवार आहे. आंतरभारती संस्था असती तर दोन राज्या राज्यांमध्ये वाद निर्माण झाला नसता. दहावी, बारावीतील मुले फ्रेंच, जर्मन यासारखे विषय घेतात. ते भारतीय भाषा घेऊ शकत नाही का असा प्रश्न उपस्थित केला. विद्यार्थ्यांना प्रांतावर भाषा शिकवा म्हणजे ते इतर राज्यात जावू शकतात असे मत मांडले.

 

गांधी पुसण्याचा उद्योग सुरू झाला

 

अमर हबीब म्हणाले की, दोन समाजातील संवाद बंद करणाऱ्या भिंती उभारण्यात आले आहेत. गांधी पुसण्याचा उद्योग सुरू झाला आहे. गांधी समजून घेतल्या शिवाय देश समजून घेता येत नाही. गांधीमुळे देश एक झाला. आंतरजातीय विवाहांना मानवीय विवाह संबोधले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

 

आंतरभारतीत विविधतेचा एकता पाहण्याचे सामर्थ्य

 

चंद्रकांत भोंजळ म्हणाले की, आंतरभारतीत विविधतेचा एकता पाहण्याचे सामर्थ्य आहे. मानसिक दुरावा कमी करण्यासाठी आंतरभारतीची गरज आहे. दुसऱ्या भाषेतील बेस्ट सेलर, वादग्रस्त पुस्तकांचे अनुवाद होत आहेत. यातून आंतरभारतीचे तत्त्व पुढे जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अनुदानाकरीता धोरण ठरविले गेले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

युवराज मोहिते म्हणाले की, मानवी संस्कृतीचा उदय आदान प्रदानातून झाला आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी वेदांचे भाषांतर केले. साने गुरुजी यांनी पंढरपूर येथे केलेला मंदिर प्रवेश हा आंतरभारतीचा प्रयोग होता.

 

आंतरभारती नाविन्यपूर्ण विचार पेरणारी प्रेरणा

 

अध्यक्ष डॉ. सुभाष किन्होळकर म्हणाले की, साने गुरुजी यांनी स्वप्न साकार नाही झाले तर स्वप्नाचा पाठलाग करत जगत राहावे, हा संदेश दिला आहे. त्यांची दृष्टी ज्ञान, प्रांत, पक्षापुरती मर्यादित राहिली नाही. आंतरभारती नाविन्यपूर्ण विचार पेरणारी प्रेरणा आहे. आंतरभारती संकल्पनेचा विस्तार कसा होईल, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. भारतीयांत ऐक्य हवे. ऐकोपा, संमजस्यपणा आपापसातील वैर संपविते म्हणजेच आंतरभारती असल्याचे मत विषद केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button