खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

‘बा, तथागता: मानवतावादी सौंदर्यशास्त्र ‘ या ग्रंथावरील चर्चाचिंतन व प्रकाशन सोहळा

अमळनेर (प्रतिनिधी) महात्मा क्रांतिबा फुले जयंती विशेषाच्या निमित्ताने दिनांक ११ एप्रिल रोजी ‘बा’ तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा प्रताप महाविद्यालय येथे उद्या सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

मानवतावादी विचारवंत तथा सुप्रसिद्ध साहित्यिक म. सु. पगारे  लिखित ‘बा, तथागता’ या अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या विशाल काव्यावर आधारित चर्चाचिंतन तसेच ‘ बा, तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’ या डॉ. रमेश माने संपादित समीक्षा ग्रंथाचा प्रकाशन सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू तथा कवी लेखक आणि विचारवंत प्रा. डॉ. एन. के. ठाकरे हे अध्यक्षस्थानी असतील. तसेच या ग्रंथाच्या निमित्ताने विविध अंगाने चर्चा, टिप्पणी, समीक्षा आणि संशोधन अशा चौफेर पद्धतीने वैचारिक मतांचा ऊहापोह या कार्यक्रमात होणार आहे.  या कार्यक्रमात चर्चाचिंतनासाठी प्राचार्य तथा प्रसिद्ध साहित्यिक डॉ. संजीव गिरासे, साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ व अभ्यासक डॉ. धनराज धनगर यांची चर्चक म्हणून मार्मिक मल्लिनाथी होणार आहे.  तथागत भगवान बुद्ध यांच्या विशुद्ध कृतिशील संशोधनातील विचार तत्त्वज्ञानाचा माणसाच्या सर्वंकष कल्याणासाठी होणारा उपयोग ही संपूर्ण मानवी कल्याणाची जमेची बाजू आहे. त्या संदर्भातील सूक्ष्म अभ्यास, चिंतन, निरीक्षण व संशोधन करून डॉ. म. सु. पगारे यांनी तीन आविष्करणातून सामान्य माणसातल्या सामान्य वाचकाला कळावे  आणि त्यातून शुद्ध आचरणाची प्रेरणा मिळावी, अशा पद्धतीचा विशाल काव्याचा प्रयोग या ग्रंथातून केला आहे. साहित्य, तत्वज्ञान, इतिहास अशा विविध अनुषंगाने हा पूर्णतः वेगळा आणि नाविन्यपूर्ण प्रयोग असल्यामुळे या ग्रंथाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. बा, तथागता या ग्रंथाच्या दोन आवृत्या प्रकाशित होऊन संपण्याच्या मार्गावर आहेत. त्याचप्रमाणे या ग्रंथाची हिंदी आवृत्ती लवकरच प्रसिद्ध होणार असून इंग्रजी आवृत्तीचे देखील नियोजन सुरू आहे. शिवाय अहिराणीमध्ये देखील नव्याने आवृत्ती प्रकाशित  होण्याचे कार्य सुरू आहे. त्यामुळे या ग्रंथातील मांडणी मोठ्या जनसमूहाला  विवेकी पध्दतीने विचार करायला लावणारी आहे तसेच  मानवतावादाच्या केंद्राला स्पर्श करून माणुसकीचे मूल्य जोपासायला लावणारी आहे. ‘बा, तथागता : मानवतावादी सौंदर्यशास्त्र’  या डॉ. रमेश माने यांनी संपादित केलेल्या ग्रंथामध्ये एकूण एकवीस विचारवंतांच्या संशोधन व समीक्षणात्मक लेखांचा वैविध्यपूर्ण धांडोळा आढळतो. त्यामुळे अशा महत्त्वाच्या असणाऱ्या प्रकाशन सोहळ्यासाठी मान्यवर म्हणून प्रताप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. जैन तसेच  प्रशांत पब्लिकेशनचे प्रकाशक रंगराव पाटील हे उपस्थित राहाणार आहेत. या संपूर्ण कार्यक्रमाचे दिमाखदार सूत्रसंचालन एरंडोल येथील साहित्यिक विलास मोरे हे करणार आहेत. या चर्चाचिंतनाचा आणि प्रकाशन सोहळ्याचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आयोजक मराठी विभाग प्रमुख डॉ. रमेश माने  व मराठी विभागातील प्रा. ज्ञानेश्वर कांबळे, प्रा. योगेश पाटील, डॉ. विलास गावीत, प्रा. प्रतिभा पाटील यांनी आवाहन केले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button