खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
ताज्या बातम्या

सापाबरोबरच शासकीय यंत्रणेच्या दंशाने डांगर येथील चिमुरड्याचा गेला बळी?

मंत्र्यांच्या तालुक्यातील घटनेने ‘शेजारीनले लुगडा आणि घरना पोरे उघडा’ असल्याची गत

आरोग्य यंत्रणेतील दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चिमुरड्याला न्याय मिळेल का ?

अमळनेर (प्रतिनिधी) सकाळीच आईवडील शेतात मजुरीसाठी निघून गेल्यावर उज्वल भविष्याचे स्वप्न घेऊन शाळेची वाट चालू लागलेल्या चिमुरड्याला रस्त्यांमध्येच लपवलेले सोरटची चिठ्ठी काढताना तिथे टपून बसलेल्या सापाने त्याला दंश केला. आणि तेथून त्याच्या जीवन मरणाची संघर्षमय करुणा कहाणी सुरू झाली… आणि अखेर शासकीय आरोग्य यंत्रणेने त्याचा बळी घेतला. निपचित पडलेल्या दहा वर्षाच्या चिमूरड्याला पाहून त्याच्या आईसह कुटुंबाने फोडलेल्या हंबरडा पाहून सारे गाव गलबलून गेले. मंत्र्याच्या तालुक्यात शासकीय आरोग्य यंत्रणेमुळे गेलेल्या निष्पाप बळीचा समाज मनातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे..
ही करुणा कहाणी आहे, अमळनेर तालुक्यातील डांगर बु. येथील आकाश राजेंद्र भिल (इयत्ता ४ थी वय १० वर्ष) या चिमुरड्याच्या मृत्यूची… आकाश हा दि. २९ रोजी सकाळी १०.३० वाजता आई वडील शेतात मजुरी कामासाठी गेले असता तो जिल्हा परिषद शाळेत जात होता. रस्त्यात त्याने लपवलेली सोरटची चिट्ठी काढण्यासाठी त्याने अडगळीत हात टाकला. तेथेच लपून बसलेल्या सापाने त्याला दंश  केला. तर दहा वर्षाच्या कोवळ्या जीवाला काहीतरी चावल्याची जाणीव झाली. मात्र हा आपलाच मृत्यू असेल याची जाणीवही त्याच्या मनात नसताना शाळेत न जाता घरी जात झोपी गेला. मात्र काही वेळाने त्याला त्रास जाणू लागल्याने शेजारी असलेल्या काकूच्या लक्षात आले. त्यांनी त्याच्या काकाला माहिती देताच ते आले आणि त्यांनी तातडीने डांगर होऊन जानवे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. तिथे डॉक्टर अमोल अहिरे यांनी सर्पदंश प्रतिबंधक लस देऊन प्राथमिक उपचार केले मात्र आकाशाचा श्वास कमी जास्त होत असल्याने त्याला व्हेंटिलेटरची गरज होती म्हणून त्यांनी त्याला अमळनेर ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. तेथे गेल्यावर त्याला अधिकच त्रास जाणवु लागला. मात्र अमळनेर ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटरची यंत्रणा असतानाही त्याला धुळे येथे जाण्याचा सल्ला देण्यात आला. आणि त्याच्या काकाने त्या कोवळ्या जीवाला कवेत घेत पुन्हा धुळ्याची वाट धरली. मात्र अमळनेर धुळेचे अंतर 30 किलोमीटरच्या वर असल्याने आणि आधीच सापाने दंश करून बराच वेळ झाल्याने विष त्याच्या अंगात पसरून त्याला अधिकच त्रास होऊ लागला. गलितगात्र झालेल्या या चीमुरड्याला धुळे जिल्हा रुग्णालय दाखल केल्यावर डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले आणि त्याच्या काकासह कुटुंबीयांनी रुग्णालयातच टाहो फोडला.

ग्रामीण रुग्णालयातील व्हेंटिलेटर व्यवस्था धुळ खात पडून

अमळनेर ग्रामीण रुग्णालयावर संपूर्ण तालुक्यातील आरोग्य सेवेची जबाबदारी आहे. मात्र येथील आरोग्य यंत्रणेचा कारभार ढिसाळ, उदासीन आणि ढिम्म असल्याचा प्रत्यय आकाश या चिमुरड्याच्या मृत्यूनंतर चव्हाट्यावर आला आहे. कोरोना काळात विप्रो कंपनीने आपल्या दातृत्वातून अमळनेर ग्रामीण रुग्णालयाला व्हेंटिलेटरची चांगली सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र ही यंत्रणा सुसज्ज ठेवण्यास ग्रामीण रुग्णालयाला सपशेल अपयश आले आहे. आज ही यंत्रणा सुस्थितीत कार्यान्वित राहिली असती तर आकाश सारख्या निष्पाप चिमुरड्याचा बळी गेला नसता. म्हणून ही यंत्रणा सुस्थिती ठेवण्याची जबाबदारी कोणाची? असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागला.
ही यंत्रणा हाताळण्यासाठी टेक्निशियन नसल्याचे कारण ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात येत आहे मात्र याच रुग्णालयात करार तत्वावर खाजगी डॉक्टरांची नियुक्ती करून त्यांना दरमहा 80 ते 90 हजार रुपये मानधन दिले जाते हेच डॉक्टर आपल्या खाजगी रुग्णालयात व्हेंटिलेटर स्वतः हाताळतात. मग एवढे गले लठ्ठ मानधन घेऊनही ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटरची यंत्रणा हाताळण्यास त्यांना कमीपणा का वाटतो? खरंतर आरोग्य सेवा ही ईश्वर सेवा असल्याने खाजगी असो की शासकीय ती प्रामाणिकपणाने देऊन रुग्णांचे प्राण वाचवणे हे आरोग्य यंत्रणेचे आद्य कर्तव्यच आहे. मात्र ग्रामीण रुग्णालय हे आपले आद्य कर्तव्यच विसरून गेल्याने आकाश सारख्या चिमुरड्यांचा आणखी किती बळी घेणार? असा संतापजनक सवाल आहे या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मंत्र्यांच्या तालुक्यातील विषारी घटना

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या तालुक्यातीलच ही घटना आहे. त्यामुळे अधिकच खेदाची बाब म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे. एखाद्या सर्पदंशाच्या रुग्णावर उपचार करणारी पुरेशी यंत्रनाही तालुक्यात कार्यान्वित नसेल तर याला काय म्हणावे? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. साऱ्या राज्याचे पुनर्वसन आणि मदतीसाठी पुढे असलेल्या मंत्र्यांच्या तालुक्यात मात्र ‘शेजारीनले लुगडा आणि घरना पोरे उघडा’ अशी स्थिती तालुक्यात निर्माण झाल्याचे या घटनेवरून उघड झाले आहे. त्यामुळे मदत व पुनर्वसन मंत्री या घटनेकडे किती गांभीर्याने घेतात आणि या कुटुंबाला न्याय मिळवून देतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.

टेक्निशियन कर्मचारी नसल्याने व्हेंटिलेटरचा वापर नाही

अमळनेर ग्रामीण रुग्णालयाला कोरोना काळातील विप्रो कंपनीने व्हेंटिलेटर ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे मात्र यंत्रणा करण्यासाठी टेक्निशियन कर्मचारी नसल्याने तिचा वापर ग्रामीण रुग्णालयात होत नाही आकाश याला व्हेंटिलेटर आणि पुढील उपचाराची गरज असल्यामुळे त्याला धुळे येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले होते दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला याची खंत आहे.
डॉ. ताडे, ग्रामीण रुग्णालय, अमळनेर

अमळनेर तालुक्यासाठी शरमेची घटना

डॉक्टरांचा एकमेकांशी सुसंवाद नसल्यामुळे व ग्रामीण रुग्णालयात व्हेटिलेटर असून ते वापरत नसल्यामुळे या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही तालुक्यासाठी शरमेची बाब आहे. तर मंत्र्यांच्या तालुक्यात घडलेली घटनाही संताप जनक आहे. याचा जाब मंत्र्यांसह आरोग्य यंत्रणेला द्यावाच लागेल.
या घेटनेची सखोल चौकशी व्हावी यासाठी जिल्हाशल्य चिकित्सक व आरोग्य मंत्री यांची भेट घेणार आहोत.

सचिन पाटील, तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, अमळनेर

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button