राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रांत अधिकार्यांना निवेदन देऊन केली भरपाई देण्याची मागणी
अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यात गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे शेतकर्यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून कृषी विभागामार्फत त्वरित पंचनामे करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील यांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना निवेदन दिले.
पाटील यांनी प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर तालुक्यात गुरुवारी अचानक रात्री वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, भुईमूग, केळी व इतर रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही पिके आता परिपक्व झाली होती. त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. म्हणून शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून कृषी विभागाने त्वरित पंचनामा करून शेतकर्यांना दिलासा द्यावा. निवेदनावर तालुका अध्यक्ष सचिन बाळू पाटील, तालुका कार्याध्यक्ष सुरेश पाटील, शहराध्यक्ष सुनील शिंपी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.