खबरीलालच्या बातम्या मिळवा आपल्या मोबाइल वर

Join WhatsApp
क्राईम

बिडिओ, दोन विस्तार अधिकाऱ्यांसह सहा जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा

मठगव्हाण येथील महिला सरपंचाने दिलेल्या फिर्यादीने उडाली खळबळ

अमळनेर (प्रतिनिधी) शाळा दुरुस्ती व शौचालयाच्या कामात अपहाराचा ठपका ठेवत चौकशी लावली. तसेच एक लाखाची खंडणी मागून जातीवाचक शिवगाळ करीत सरपंचपदावरून अपात्र करण्याचा प्रयत्न केल्याने तालुक्यातील मठगव्हाण येथील महिला सरपंचाने दिलेल्या फिर्यादीवरून गटविकास अधिकारी, दोन विस्तार अधिकाऱ्यांसह सहा जणांविरुद्ध अॅट्रॉसीटीचा आणि खडणीचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.  
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, अमळनेर  तालुक्यातील मठगव्हान येथील तत्कालीन सरपंच मायाबाई प्रवीण वाघ या २२ फेब्रुवारी २०१८ पासून सरपंच पदाचा कारभार पाहत होत्या. गावाच्या अडी अडचणी व विकास कामासंदर्भात गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी यांचा घरपट्टी व पाणी पट्टी वसुलीचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. ४ डिसेंबर २०१९ रोजी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम कामाबद्दल वर्गणी तसेच काँट्रिब्यूशनच्या नावाखाली १ लाख रुपयांची खंडणी मागितली. म्हणून सरपंच वाघ यांनी लगेच ६ डिसेंबर रोजी किरण पवार व शिवाजी पवार यांच्यासोबत गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी उद्धट उत्तरे देऊन त्यांना हाकलून दिले. पुन्हा ग्रामसेवकपद रिक्त असल्याने २८ डिसेंबर रोजी गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेतली असता त्यांनी अश्लील व जातीवाचक शब्द वापरले. त्यामुळे त्यांनी कंटाळून २४ फेब्रुवारी २०२० रोजी सभापतींकडे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिला. मात्र सभापतींनी राजीनामा नामंजूर करून गटविकास अधिकारी वायाळ याना माफी मागायला लावली. त्यामुळे वायाळ यांची द्वेष भावना अधिक वाढली.  त्यांनी गावातील सदस्य राजेश धनराज गांगुर्डे, किरण दोधू शिरसाठ, मंगलाबाई प्रवीण सोनवणे यांना हाताशी धरून खोटे अर्ज देऊन चौकशी लावली. चौकशीसाठी विस्तार अधिकारी एल. डी. चिंचोरे, विस्तार अधिकारी अनिल राणे हे आल्यानंतर त्यांनी ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. त्यांना पैसे न दिल्याने त्यांनी खुलाश्याचे अवलोकन न करता सरपंचपद अपात्र करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे अहवाल पाठवला.

अपहाराच्या आरोपाचा ठपका ठरला खोटा…..

 
९ नोव्हेंबर २०२० रोजी सुनावणीसाठी बोलावले असता २०१७- १८ कालावधीतील शाळा दुरुस्ती व मुलींच्या शौचालय बांधकामाचा ५ लाख ७७ हजार १९७ रुपयांचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. प्रत्यक्षत त्या काळात त्या सरपंच नव्हत्या. ही बाब लक्षात आल्यावर त्याच तारखेला त्याच अपहाराचा ठपका तत्कालीन सरपंच चेतना जितेंद्र पवार यांच्यावर ठेवला. यावरून लावलेले आरोप खोटे असल्याचे स्पष्ट झाले. मागासवर्गीय समाजाची असल्याने हेतुपुरस्कार आकस बुद्धीने वेळोवेळी त्रास देण्यात आला, असे फिर्यादीत वाघ यांनी नमुद केले आहे. त्यांच्या या फिर्यादीवरून गटविकास अधिकारी संदीप वायाळ, विस्तार अधिकारी एल. डी. चिंचोरे, अनिल राणे, सदस्य राजेश गांगुर्डे, किरण शिरसाठ, मंगलाबाई सोनवणे यांच्याविरुद्ध खंडणी मागणे, बदनामी करणे,  अॅट्रॉसिटी  कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास डीवायएसपी राकेश जाधव करीत आहेत.

तपासात खरं, खोटे निष्पन्न होईलच

मठगव्हान प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस तपासात जे काही खरं, खोटे असेल ते निष्पन्न होईलच.
संदीप वायाळ, गटविकास अधिकारी, अमळनेर

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button