नवरा दारूडा त्याची सकाळ, दारूच्या घोटाने माहिती होतं लग्ना आधी २४ तास दारूत असतो , तरी पाचीतली एक तरी बापाला लवकर खपवायची होती.
लग्नाच्या तिसऱ्याच महिन्यात त्याचा रस्त्यावर मुडदा पडला. त्याच्या तेराव्याच्या आधीच सासरच्यानं ‘पांढऱ्या पायाची’ म्हणून घराबाहेर काढलं. बाया पाहताच कुजबुजत,” हळदीचा रंग उतरला नाही अन् ह्या बाईने नवऱ्याला गिळलं.”
एका महिन्याची पोटूशी असलेल्या माय बापाचा दरवाजा वाजवला. बापानं पण ” दिलेली गाय – तिची आशा काय? “, या परंपरागत उक्तीखाली ऊंबरठा ओलांडू दिला नाही.
ज्यांना स्वतःचे समजत होती त्या सासरच्यांना व माहेरच्यांना मी मेले होते. आता मी कुणाची सून ना कुणाची मुलगी , आता होती ती फक्त एक “स्त्री.”
पोटच्या गोळ्याला एकटीनं पोटात वाढवताना पाहून , जगाच्या नजरा संशयानं माझ्या शरीरावर फिरू लागल्या. आता जगाला माझ्यात रांडीचं स्वज्वळ रूप दिसत होतं.
पोराचं व स्वतःच पोट भरण्यासाठी लोकांच्या दरवाज्यासमोर काम मांगायला हात पसरवायची तेव्हा कुणी ऊंबरठा ओलांडू दिला नाही. मात्र जसा छातीवरचा पदर बाजूला सारला , जगानं बेडरूमपर्यंत नेलं.
स्त्री म्हणून जगायचा प्रयत्न केला मात्र जगानं फक्त माझ्यात मादी बघीतली. त्यांना माझे याचनेसाठी पसरलेले हात दिसले नाहीत , छाती मात्र दिसली. डोळ्यातील ओलावा दिसला नाही शरीरातला ओलावा मात्र जीभे-तोंडानं चाटला. जगाची नियत कळली- “मागितल्यानं कुणी देत नाही, काहीतरी दिल्याशिवाय काहीही मिळत नाही.” पोटच्या कातड्याला जगवण्यासाठी शरीराची चामडी विकली.
साडी ओढून चालायचे तेव्हा जगानं मागून-पुढून भोगलं. आज साडी सोडली , मी जगाला भोगत आहे , जमान्याचं अंथरूण पांघरूण करून आता फरक एवढाच पडला आजपर्यंत मी जगाचा आसरा शोधत होते पदर पसरून. आज जग याच पदराचा आसरा शोधत हिंडत असते आमच्या नागड्या वस्तीत…..
शेवटी एकच सत्य- ” जगाला ‘स्त्री’ नकोय , मात्र ‘मादी’ हवी…… लेखक- सुधीर पाटील
( पोस्ट चोरण्याचा प्रयत्न करू नये. लेखनाचे सर्व अधिकार राखून ठेवले आहेत.© )