अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर महसूल आणि कृषी विभागाच्या मस्तवाल अधिकाऱ्यांनी विमा कंपनीशी मिलीभगत केल्याने अमळनेर तालुक्यात दुष्काळ असूनही शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला नसल्याने अधिकाऱ्यांची मस्ती जिरवून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी मंत्र्यांना साकडे घालण्याचा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
गेल्यावर्षी अमळनेर तालुका दुष्काळी जाहीर झाला नसताना देखील शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5 ते 24 हजार रुपयांपर्यंत सुमारे 44 कोटी विमा मंजूर झाला होता मात्र यंदा तालुक्यात 50 टक्के पेक्षा पाऊस कमी झाल्याने तालुका दुष्काळी जाहीर झाला आहे एकूण 13 हजार 780 शेतकऱ्यांच्या 15 हजार 545 हेक्टर क्षेत्राचा कापूस पीक विमा काढला आहे तरी देखील निव्वळ अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे आणि घरी बसून कागदे रंगवण्याच्या प्रवृत्तीमुळे शिरूड व्यतिरिक्त कुठल्याही मंडळात पीक विमा मंजूर झालेला नाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निर्लज्ज पणाचा कळस म्हणजे गडखाम्ब क्षेत्रात बागायती उत्पन्न 5 क्विंटल दाखवण्यात आले तर कोरडवाहू उत्पन्न 10 क्विंटल दाखवण्यात आले आहे , दुष्काळी अनुदान देताना अधिकारी फक्त जिरायती शेती दाखवतात तर पीक विमा पंचनामा करताना बागायती व जिरायती असे प्रकार केले जातात , 15 दिवसाचा खंड असेल तरी पीक विमा मंजूर करता येतो असे असताना अमळनेर तालुक्यात दीड महिन्याचा खंड पडला आहे ,त्याच प्रमाणे प्रत्येक मंडळात स्वतंत्र बागायती व जिरायती पंचनामे करणे आवश्यक असताना आळशी आणि नालायक अधिकाऱ्यांनी भरवस मंडळात फक्त बागायती पंचनामे केले तर वावडे मंडळात फक्त जिरायती पंचनामे करून दोघांची सरासरी केली त्यामुळे सदोष पंचनामे झाले आणि शेतकऱ्यांना अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी ओरड करूनही अधिकारी लक्ष देत नाहीत संबंधित अधिकारीच्या कानावर ही बाब टाकूनही दुर्लक्ष केले जात आहे , तसेच वावडे भागात गटांचे उत्पन्न कमी असतानाही पंचनाम्यात जास्त दाखवण्यात आल्याची लेखी कबुली वावडे मंडलाधिकारी आर पी शिंदे यांनी दिले आहे याचा अर्थ महसूल चे अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांनी विमा कंपनीशी तडजोड केली आहे हे स्पष्ट होते त्यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार अजिबात सहन करणार नाही याबाबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना साकडे घालून अधिकाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही अधिकाऱ्यांना जनप्रक्षोभाचे परिणाम भोगावेच लागतील असा इशारा उदय वाघ यांनी दिला आहे.