आढावा बैठकीत खासदार स्मिता वाघ यांनी प्रशासनाला दिले निर्देश
अमळनेर (प्रतिनिधी) येथील नगरपरिषदेने वाढीव मालमत्ता कर संदर्भात सन्मानजनक तोडगा काढावा तसेच काही वर्षांपूर्वी योजनेसाठी सुरू केलेली १० टक्के लोकवर्गणी घेणेही तात्काळ थांबवावी, अशा सूचना खासदार स्मिता वाघ यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आढावा बैठकीत दिल्या. तसेच खाजगी संस्थेकडून सुरू असलेले सर्वेक्षण थांबवून पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून नवीन सर्वेक्षण करण्याचे आणि मालमत्ता हस्तांतरण मूल्य २% ने कमी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेने खासदार वाघ यांना वाढीव मालमत्ता करासंदर्भात निवेदन दिल्यानंतर त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना तात्काळ आढावा बैठक घेण्यास सांगितल्याने त्यानुसार १७ जुलै रोजी पालिकेच्या सभागृहात मुख्याधिकारी नेरकर आणि सर्व विभागप्रमुखांच्या उपस्थितीत बैठक झाली. या वेळी भाजप युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे, माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी, गोपी कासार, माजी नगरसेवक श्याम पाटील, निलेश भांडारकर आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार वाघ यांनी विभागनिहाय आढावा घेतला. नवीन मालमत्ता करासंदर्भात विविध प्रश्न उपस्थित करून, २०१२ पासून काही विशिष्ट कामांसाठी सुरू केलेली १० टक्के लोकवर्गणी आजही वसूल करत आहे, यामुळे खासदार वाघ यांनी नाराजी व्यक्त करत याचा खुलासा मागितला आणि ती रद्द करण्याची मागणी केली. यासाठी शासन दरबारी प्रस्ताव सादर करा. मी स्वतः याचा पाठपुरावा करेल असे सांगितले. शेवटी खासदार वाघ यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मुख्याधिकारी नेरकर यांनी समर्पक उत्तरे दिलीत. यावेळी भाजप शहराध्यक्ष योगेश महाजन, हरचंद लांडगे, शितल देशमुख, उमेश वाल्हे, विजय राजपूत, राकेश पाटील,राहुल चौधरी यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. आभार पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत यांनी मानले. बैठकीला पत्रकार किरण पाटील, जितेंद्र ठाकूर, महेंद्र रामोशे, आर. जे. पाटील, बाबूलाल पाटील, मुन्ना शेख, डॉ. विलास पाटील आणि इतर पत्रकार उपस्थित होते. पालिकेच्या वतीने बांधकाम अभियंता डिंगबर वाघ, सुनील पाटील, नगररचना अभियंता तोंडे, पाणीपुरवठा अभियंता प्रवीणकुमार बैसाणे, विद्युत अभियंता कुणाल महाले, महेश जोशी, लेखापाल सुदर्शन शामनानी, कुणाल कोष्टी, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास महाजन, डॉ. राजेंद्र शेलकर, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, किरण कंडारे, सुनील पाटील, शेखर देशमुख यासह कर्मचारी वर्ग उपस्थित होता.
शिक्षण विभागाचा आढावा
शिक्षण विभागाचा आढावा घेताना, शिक्षण कर किती, पालिकेच्या शाळा किती आणि विद्यार्थी संख्या किती आहे याची माहिती त्यांनी घेतली. इमारतींची दुरुस्ती व पायाभूत सुविधा वाढवून विद्यार्थी संख्या तातडीने वाढवण्यावर भर देण्यास सांगितले, जेणेकरून कोणताही गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही.
दोन दिवसाआड पाणी देण्याचे निर्देश
पाणीपुरवठा योजनेची माहिती घेऊन, कर घेतल्यानंतर पाणीही वेळेवर आणि दोन दिवसाआड देण्याचे निर्देश त्यांनी दिले. घरकुल योजनेत अमळनेर जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकावल्याबद्दल त्यांनी कौतुक केले आणि घर हे सामान्य माणसाचे स्वप्न असल्याने कुणालाही वंचित ठेवू नका यासाठी कुणी लाच मागितल्यास निलंबनाचा इशारा दिला.आरोग्य विभागाचा आढावा घेताना, घंटागाडी नियमित न येणे आणि कचरा विलगीकरणामधील गोंधळाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाब विचारला. तसेच पालिका दवाखान्याची माहितीही घेतली. लाईट बिल वाचवण्यासाठी पालिका इमारत, अग्निशमन इमारत, टेकडीवरील शुद्धीकरण केंद्र यासह विविध ठिकाणी सौर ऊर्जा यंत्रणा (सोलर) बसवून वीज बिल वाचवण्याची आणि त्या पैशातून नागरी सुविधा वाढवण्याची सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी काही अधिकाऱ्यांना कामात कुचराई सहन केली जाणार नाही अशी सक्त ताकीद दिली. कार्यकर्त्यांनीही यावेळी विविध प्रश्न उपस्थित केले.