अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील दोन रेशन दुकानांचे प्राधिकार पत्र जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी रद्द केले आहेत. शिंदे सेनेचे तालुका प्रमुख यांनी केलेल्या तक्रारीवरून चौकशी करून हे आदेश काढण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील छत्रपती शिवाजी राजे बहुउद्देशीय मंडळ सात्री या संस्थेला स्वस्त धान्य दुकान १०१ जोडले होते. तर निर्मलाई फौंडेशन सात्री या संस्थेला मुडी येथील स्वस्त दुकान क्रमांक १११ जोडण्यात आले होते. मात्र या दोन्ही संस्थांची मान्यता धर्मदाय आयुक्तांनी रद्द केल्या होत्या. तरीही या संस्थाना स्वस्त धान्य दुकाने जोडलेली होती. यासंदर्भात शिंदे सेनेचे तालुका प्रमुख सुरेश अर्जुन पाटील यांनी तक्रारी केल्या होत्या. त्याची चौकशी करून जिल्हा पुरवठा अधिकारी रुपेश बिजेवार यांनी ११ जुलै रोजी दोन्ही संस्थांच्या नावावर असलेल्या स्वस्त धान्य दुकानांचे प्राधिकार पत्र रद्द केले आहे. दोन्ही दुकानांना जोडलेल्या शिधापत्रिका तात्काळ शासन नियमाप्रमाणे जवळच्या दुकानास जोडण्याचे निर्देश दिले आहेत.