न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी तापी बोरी आणि अनेर नदीच्या त्रिवेणी संगमावर आंदोलनाचा दिला इशारा
अमळनेर (प्रतिनिधी) पाडळसरे प्रकल्पांतर्गत तापी, बोरी आणि अनेरच्या संगमावरील बोहरा गावाचे १०० टक्के पुनर्वसन झालेच पाहिजे या मागणीसाठी सुमारे २५० ग्रामस्थांनी तहसील कार्यालय तसेच आमदार कार्यालयावर दि. १६ जुलै रोजी मोर्चा काढला. न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी तापी बोरी आणि अनेर नदीच्या त्रिवेणी संगमावर आंदोलन करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
पाडळसरे प्रकल्पाचे करण्यात आलेले सर्वेक्षण अत्यंत चुकीचे झाले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बोहरा गाव नियोजित धरणाच्या एक किमी अंतरावर आहे. तसेच तापी, बोरी आणि अनेरच्या संगमावर आहे. २००५ -०६ साली अतिवृष्टी झाली होती तेव्हा संपूर्ण गावाला पाण्याचा वेढा पडला होता. ग्रामस्थ आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवावे लागले होते. त्यावेळी धरणाचा पाया देखील बांधला गेला नव्हता. जेव्हा धरण होईल तेव्हा तेव्हा बोहरा गाव पूर्ण पाण्याखाली येईल. त्यामुळे तत्कालीन प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून गावावर अन्याय झाला आहे, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तत्कालीन जिल्हा पुनर्वसन अधिकारी गजेंद्र पाटोळे यांनी २६ मार्च २०२५ रोजी सर्व अधिकाऱ्यांसह भेट दिली. तेव्हा गावाची नवीन हाय फ्लड टेस्ट, प्लॉट टेस्ट घरांचे संरचनात्मक ऑडिट व नवीन माती परीक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु तीन महिने उलटूनही त्यावर काही कारवाई झाली नाही. तसा अहवालही तयार करण्यात आला नाही. त्यामुळे गावाचे पुनर्वसन पूर्णतः करण्यात यावे, यासाठी बोहरा ग्रामस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहपासून मोर्चाला सुरुवात केली. नाट्यगृह, मंगलमूर्ती चौक, स्टेशन रोड, महाराणा प्रताप चौक मार्गे मोर्चा कचेरीवर धडकला.
घोषणांनी परिसर दुमदुमला आधी पुनर्वसन मग धरण, बोहरा गावचे पुनर्वसन झालेच पाहिजे , शेतजमिनीचा न्याय निवाडा लवकर करून मोबदला मिळालाच पाहिजे, फ्लड टेस्ट , माती परीक्षण ऑडिट नीट झालेच पाहिजे असे फलक झळकत होते. त्याच प्रकारच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. नायब तहसीलदार अजय कुलकर्णी याना निवेदन देण्यात आले. तेथून मोर्चा आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी गेला. ठिय्या मांडून घोषणाबाजी केली. आमदारांच्या प्रतिनिधी म्हणून जयश्री पाटील यांनी निवेदन स्वीकारले. शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत बोहरा ग्रामस्थांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले.
मोर्चात शिवाजी बागुल, देविदास फुलपगारे ,दीपक धनगर, निखिल धनगर , दगडू पाटील , जयेश बागुल , बन्सीलाल भिल, सुनील अहिरराव , सुधीर पाटील , प्रभाकर विंचूरकर , पंकज बागुल , कैलास रोकडे , समाधान रोकडे , ऋषिकेश कोळी , महारु कोळी , पुंडलिक वाघ , भटू धनगर , विलास भिल , चंद्रभान कोळी , अंबादास भिल , संजय अहिरराव , आनंद रोकडे , विलास नाईक , सुरेश भिल ,शिवाजी कोळी, धरण संघर्ष समितीचे सुभाष चौधरी , रणजित शिंदे, पंकज मुंदडा , रामराव पाटील यांच्यासह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
पोलिसांनी अडवला मोर्चा मोर्चा तहसील कार्यालयाच्या आवारात पोलिसांकडून अडवण्यात आला. नायब तहसीलदार कुलकर्णी यांनी मोर्चातील गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत निवेदन स्वीकारले.गावच्या पूर्णतः पुनर्वसनाबाबतची कार्यवाही व अहवाल तातडीने तयार करून आवश्यक ती कारवाई न केल्यास १५ ऑगस्ट २०२५ स्वातंत्र्यदिनी बोहरे येथील सर्व ग्रामस्थ तापी,बोरी नदीच्या संगमावर जलसमाधी घेऊ याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील. असा इशारा गावकऱ्यांतर्फे याप्रसंगी झालेल्या चर्चेत दिला.