अमळनेर (प्रतिनिधी) अमळनेर शहरात गांजा विक्रीसाठी आणणाऱ्या भडगाव व पाचोरा तालुक्यातील दोघा तरुणांना अमळनेर पोलिसांनी गजाआड केले आहे. जळोद शिवारात १५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास अटक केली आहे. त्याच्याजवळून तीन लाख रुपये किमतीचा १५ किलो ४० ग्राम गांजा व ४० हजार रुपये किमतीची मोटरसायकल असा ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना माहिती मिळाली की जळोदकडून अमळनेरकडे दोन तरुण मोटरसायकलने गांजा विक्रीसाठी आणत आहेत. त्यांनी डीवायएसपी विनायक कोते यांची परवानगी घेऊन त्यांच्यासोबत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे, सपोनि सुनील लोखंडे, अमोल पाटील, गणेश पाटील, जितेंद्र निकुंभे, प्रशांत पाटील, योगेश बागुल, सुनील पाटील यांना तसेच पंच घेऊन जळोद येथील दीपक बाजीराव पाटील यांच्या शेताजवळ दबा धरून बसले. रात्री १० वाजून १० मिनिटांनी जळोद कडून एक मोटरसायकलवर ( क्रमांक एम एच १९ सी टी ४८४५) दोन तरुण येताना दिसले. पोलीस निरीक्षक निकम यांनी त्यांना अडवून मोटरसायकलवरील गोणीत गांजा असल्याचे आढळून आले. त्यांनी त्यांची नावे महेश कैलास पाटील (वय ३१ रा मेन रोड जडे गल्ली भडगाव) व नितीन शरद गौंड (मसराम, वय १९ रा गौंड वस्ती देशमुख नगर पाचोरा) असे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडील १५ किलो ४० ग्राम गांजा व मोटरसायकल यांचा पंचनामा करून जप्त केला. दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध एनडीपीएस कायदा अधिनियम १९८५ च्या कलम ८,२०,२२ आणि भारतीय न्याय संहिता ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील लोखंडे करीत आहेत.