२०१७ चा ठराव अजूनही धूळखात पडून, नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन
अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील पिंपळे रोड व ढेकू रोड परिसरात भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, मृत्यू झाल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्वतंत्र व सुसज्ज स्मशानभूमीसाठी २०१७ मध्ये ठरावही करण्यात आला होता. परंतू त्यावर अजूनही अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे त्वरित स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात नागरिकांनी नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सद्यस्थितीत मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार ताडेपुरा परिसरातील एकमेव स्मशानभूमीत करावे लागतात. ही स्मशानभूमी पिंपळे रोड व ढेकू रोड परिसरापासून सुमारे ३ ते ४ किलोमीटर अंतरावर आहे. तेथपर्यंत पोहोचण्यासाठी बसस्थानक, दगडी दरवाजा, बाजारपेठ अशा अत्यंत गर्दीच्या व वर्दळीच्या मार्गांवरून जावे लागते. परिणामी, अंत्ययात्रेच्या वेळी वाहनांना अडथळे निर्माण होतात व अंत्यसंस्कार उशिरा होतात. याशिवाय बाहेरगावाहून आलेल्या नातेवाईकांनाही स्मशानभूमीपर्यंत पोहोचणे कठीण होते. विशेष म्हणजे, अमळनेर नगरपरिषदेने २०१७ साली पिंपळे रोड परिसरासाठी स्वतंत्र स्मशानभूमी स्थापन करण्याचा ठराव मंजूर केला होता. मात्र, सात वर्षांचा कालावधी उलटूनही जागा निश्चित न झाल्यामुळे हा प्रस्ताव अद्याप फाईलमध्येच अडकून पडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पिंपळे रोड व ढेकू रोड परिसरालगत असलेल्या उपलब्ध सरकारी जमिनीतून स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करण्यात यावी. तसेच त्या जागेवर लवकरात लवकर स्मशानभूमी उभारण्यात यावी, जेणेकरून या भागातील नागरिकांना दिलासा मिळेल. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात ॲड. यज्ञेश्वर पाटील, डि.ए. धनगर, प्रफुल बोरसे, संदीप सोनवणे, अविनाश पाटील, ज्ञानेश जोशी, गणेश पाटील, राकेश बाजीराव पाटील, तुषार पाटील, अनिरुद्ध शिसोदे, राकेश पाटील, मनीष पाटील यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.