अमळनेर (प्रतिनिधी) घराचा दरवाज्याचा कडी कोंडा तोडून शेतीच्या मशागतीसाठी बँकेतून काढलेले ५७ हजार ५०० रुपये चोरट्याने चोरून नेल्याची घटना तालुक्यातील धुपी येथे ७ रोजी घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, धुपी येथील सुभाष श्रीराम जाधव यांनी शेतीच्या मशागतीसाठी ५७ हजार ५०० रुपये बँकेतून काढून घरातील लोखंडी कपाटात ठेवले होते. ३० रोजी ते नाशिक जाताना घराला कुलूप लावून किल्ली सालदार दिलीप माधवराव देसले यांच्याकडे दिली होती. ७ जुलै रोजी सालदार घरातील लाईट लावायला गेला असता त्याला घराच्या दाराचे कुलूप कडीकोंडा तोडलेले दिसून आले. त्यांनी मालकाला फोन लावून बोलावले तेव्हा घरातील लोखंडी कपाटातील लॉकर तोडलेले व पैसे चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. सुभाष जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३३१(३), ३३१(४ ), ३०५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेडकॉन्स्टेबल संदेश पाटील करीत आहेत.