अमळनेर (प्रतिनिधी) कोट्यवधींचे काँक्रीट रस्ते करूनही एलआयसी कॉलनीतील समस्या सुटलेली नसून घरासमोर पाण्याचे डबके साचल्याने नागरिकाना त्रास होत आहे. त्यामुळे पावसाळ्यात साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पावसाळ्यात एलआयसी कॉलनी परिसरात पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात यायचे, येणाऱ्या जाणाऱ्यांना त्रास व्हायचा. दोन वाहने एकाचवेळी गेल्याने एकमेकांच्या अंगावर पाणी उडून कपडे खराब व्हायचे. नगरपालिकेने सव्वा तीन कोटी रुपयांचा मुख्य रस्ता तर लाखो रुपयांचा गल्लीतील रस्ता असे दोन रस्ते करूनही तांत्रिक दोषामुळे एलआयसी कॉलनी चौकात पाण्याचे डबके जसेच्या तसे साचून त्यात डास, कीटक, माश्यांची पैदास होऊन नागरिकांचे आरोग्य खराब होत आहे. दररोज शेकडो वाहने येथून जात असल्याने लोकांच्या अंगावर पाणी उडते. तसेच मोटरसायकली चालवायला देखील त्रास होतो. गोविंद चौधरी या सेवानिवृत्त शिक्षकाच्या घराच्या गेट समोरच पाण्याचे डबके साचल्याने त्यांना घराबाहेर पडायला पाण्याच्या डबक्यातून जावे लागते. तांत्रिक दृष्ट्या रस्ता सदोष असून याबाबत अनेकदा पालिकेकडे तक्रार करूनही याबाबत उपाययोजना केली जात नाही. रस्त्याची देखभाल दुरुस्ती ठेकेदाराकडे तीन ते पाच वर्षे असते मात्र अवघ्या महिनाभरात रस्त्याच्या कामातील दोष आढळून आला आहे. पालिकेने त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.
उपाययोजना केली जाईल
अभियंत्याना प्रत्यक्ष पाहणी करायला पाठवून पाण्याचा निचरा कसा करावा यावर उपाययोजना केली जाईल.
– तुषार नेरकर , मुख्याधिकारी अमळनेर नगरपालिका