अमळनेर (प्रतिनिधी) सायरदेवी बोहरा स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त दिंडीचा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन सुरेंद्रकुमार बोहरा यांच्या मार्गदर्शनाने घेण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांनी विविध संतांच्या वेशभूषा केल्या होत्या. शाळेच्या पटांगणात दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येऊन रिंगण सोहळा व फुगड्या खेळण्यात आल्या. पालखी मिरवणूक काढण्यात आली.
मुख्याध्यापक जितेंद्र सिंह यांनी विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर छोट्या छोट्या विठ्ठल रुक्मिणी बनलेल्या विद्यार्थ्यांकडून विठ्ठलाची आरती करण्यात आली. यामध्ये नर्सरी ते इयत्ता तिसरीच्या विद्यार्थी सहभागी झाले. यावेळी अवघी शाळा विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमली होती. यास पंढरपूरचे स्वरूप प्राप्त झाले होते. डॉ.गौरव बोहरा, शिक्षक वर्ग तसेच इयत्ता चौथी ते दहावीचे विद्यार्थी सखाराम वाडी मधील विठ्ठल मंदिरातील दिंडीत सहभागी झाले. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून विठ्ठल नामाचा गजर करत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. हा कार्यक्रम संस्थेचे चेअरमन सुरेंद्रकुमार बोहरा व शाळेचे मुख्याध्यापक जितेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाने पार पडला.