अमळनेर (प्रतिनिधी) सा.बां. ने वळण रस्त्यावर पडलेला खड्डा बुजविण्याच्या सबबीखाली येथील प्रताप मिल कॉलनीतील चिंचोळया रस्त्याने हायवेची ट्रॅफिक महिन्याभरापासून वळविलेली आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकानी अखेर ‘तुमचा तो खड्डा सावकाश बुजवा, आमची काही हरकत नाही. किमान आमच्या रस्त्यावर पडणारा जड वाहनांचा अतिरिक्त भार कमी करुन घेण्यासाठी बाकीची ट्रॅफिक अन्य मार्गाने वळवण्यात यावी, आर्त अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने वळण रस्त्यावर पडलेला खड्डा बुजवण्याच्या नावाखाली प्रताप मिल कॉलनीतील चिंचोळया रस्त्याने हायवेची ट्रॅफिक महिन्याभरापासून वळवली आहे. त्यामुळे नागरिक या अतिरिक्त लोडेड जड वाहनांच्या रात्रीच्या अखंड वाहतुकीला वैतागले आहेत. प्रशासनाने आता एकच मेहरबानी करावी, तुमची वाहतुक सुरळीत होईपावेतो वळविलेली अतिरिक्त ट्रॅफिक उड्डाण पूलाकडून, जुन्या गलवाडे रोडने सुद्धा वळवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तहसीलदार सुराणा रोज याच रस्त्याने त्यांच्या शासकीय वाहनातून ये- जा करतात. त्यांनी या रस्त्याची समस्या समजून घ्यावी व अतिरिक्त ट्रॅफिकवर तोडगा काढावा, असे देखील नागरिक सूचवित आहेत. या ट्रॅफिकची समस्या पोलिस अधिकाऱ्यांनीपण ध्यानात घ्यावी याखेरीज सा.बां.विभाग व न.पा.ने या प्रश्नाकडे लक्ष घालावे. लोक प्रतिनिधी म्हणून आमदार अनिल पाटील यांनी स्वतः हा प्रश्न हाताळावा अशी नागरिक अपेक्षा व्यक्त करीत आहेत.