अमळनेर (प्रतिनिधी) तरुणांची सजकता आणि वृद्धाच्या प्रामाणिकपणामुळे तालुक्यातील गडखांब येथील एका महिलेचे हरवलेले पाकीटाचा शोध लागला.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील गडखांब येथील आशाबाई दामू पाटील ही महिला कामानिमित्त अमळनेरला आली होती. महाराष्ट्र बँकेजवळ त्या महिलेचे ३० हजार रुपये असलेले पाकीट हरवले. महिला रडू लागली. ती हतबल होऊन जागीच बसली होती. कोणीच तिला मदत करीत नव्हते. महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी देखील सीसीटीव्ही कॅमेरे दाखवायला तयार नव्हते. अखेरीस त्याठिकाणी पंकज भोई हे सामाजिक कार्यकर्ते आले. त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना दरडावून माणुसकीबाबत डोस देताच त्यांनी सिसीटीव्ही कॅमेरे तपासले असता. ते पाकीट एका महिलेला सापडले तिने एका म्हाताऱ्याजवळ दिल्याचे दिसून आले. त्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरून तो कुठला याचा शोध लागला. निसर्डी येथील त्या म्हाताऱ्याचे नाव शोधले तर ते दाजभाऊ दौलत पाटील असल्याचे समजले. पंकज भोई यांनी आपल्या मित्रांकडून त्या वृद्धाला फोन लावला व पाकिटबाबत विचारणा केली. दाजभाऊ पाटील यांनी प्रामाणिकपणे पाकिटबाबत कबुली दिली. आणि ते स्वतः निसर्डीहुन महाराष्ट्र बँकेजवळ आले आणि पाकीट व एटीएम कार्ड त्या महिलेला परत केले. पंकज भोईची सजगता आणि वृद्धाचा प्रामाणिकपणा याचे सर्वत्र कौतुक होत आहे.