अमळनेर (प्रतिनिधी) येथील बसस्थानकावर अनेक एसटी गाड्यांना गावाचे नाव असलेल्या पाट्या लावल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांचा मोठा गोंधळ उडत आहे. यात अपंग, वृद्ध आणि महिलांची मोठी धावपळ होते. ही गैरसोय दूर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
बसस्थानकावरून शाळकरी मुले, कॉलेजचे विद्यार्थी, वृद्ध महिला व पुरुष सर्वच प्रवासी मोठ्या अपेक्षेने गाडीत बसतात. पण ती गाडी कुठे जाणार याचीच माहिती नाही. काही वेळा गाडीमध्ये बसल्यावरही प्रवाशाला विचारावं लागतं “ही कुठे जाते?” त्यामुळे गाड्यांमध्ये संभ्रम, चुकीच्या दिशेने गेलेले प्रवासी, आणि भांडणं हे दृश्य नित्याचे झाले आहे. एसटीवर गावाच्या नावाची पाटी लावणे ही ड्रायव्हर-कंडक्टरची प्राथमिक जबाबदारी असते. पण ती पाटीच नसेल, तर सामान्य प्रवासी काय समजणार? ही निव्वळ हलगर्जीपणा नाही, तर प्रवाशांच्या विश्वासाचा अपमान आहे.
नव्या गाड्या आल्या, पण सुधारणा नाही!
अमळनेर डेपोमध्ये नुकत्याच चार नवीन एसटी गाड्या दाखल झाल्या आहेत. पण व्यवस्थेतील “गावाचं नाव लावण्याच्या साध्या नियमाकडे दुर्लक्ष” हे चित्र मात्र जैसे थेच आहे. जुन्या गाड्यांच्या पाट्या धुळखात पडल्या आहेत, आणि नवीन गाड्याही त्याच रस्त्यावर धावत आहेत.