अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्राचीन नाथ संजीवन समाधी मंदिर येथे चैत्र वद्य वरुथिनी एकादशीला प. पू. गोरक्षनाथ जयंती व चैतन्य नवनाथ महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
साधारणत: १३ व्या शतकातील अमळनेर चोपडा रोडवरील गायत्री शक्तिपीठा मागे असलेल्या ह्या नाथपंथीय समाधी मंदिराचे बांधकाम पूर्णत: दगडात असून मंदिरांत जाण्यासाठी दगडी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारांतून आत गेल्यावर जवळ जवळ चौथऱ्यावर नाथपंथीय सिद्धांच्या दोन शिवलिंगाकार संजीवन समाधी आहेत. साधकांला येथे नाथ चैतन्यांची अनुभूती येते असते. या प्राचीन नाथ स्थानावर योगी गोरक्षनाथांची मूर्ती प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आधिदैविक, आधिभौतिक आणि आध्यात्मिक तापाने पोळलेल्या मानवांचे दुःख व संकटांचे निरसन करून त्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य करणाऱ्या अशा ज्ञात-अज्ञात नाथपंथीय योग्यांच्या असंख्य समाधी-स्मृती स्थळे आसेतू हिमाचल पसरलेल्या असून त्याद्वारे जीव-ब्रह्म सेवेचे कार्य अखंडीत पणे होत आहे.
गेली ४१ वर्ष नवनाथ भक्त मंडळातर्फे या स्थानावर नवनाथ चैतन्य महापूजेचे व पूज्य गोरक्षनाथ जयंतीचे आयोजन केले जात असून गोरक्षनाथ जयंती निमित्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन नवनाथ भक्त मंडळ, अमळनेर यांनी केले आहे.