आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने तासखेडा येथील दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

अमळनेर (प्रतिनिधी) पाणी भरण्यावरून वाद झाल्यानंतर आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिल्यामुळे मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप करीत मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून तालुक्यातील तासखेडा येथील पिता पुत्रावर तब्बल दोन महिन्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तासखेडा येथील पंकज चंद्रकांत पाटील याने २४ फेब्रुवारी २०२५ रोजी गळफास  घेऊन आत्महत्या केल्याने पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याबाबत मयत पंकज याची आई मायाबाई हिने दोन महिन्यांनी फिर्याद दिली. त्यानुसार तासखेडा येथे १९ फेब्रुवारी रोजी  दुपारी पाणी भरण्यावरून वाद झाला होता. त्यावेळी मायाबाई चंद्रकांत पाटील, पती चंद्रकांत पाटील, मुलगा पंकज व मुलगी स्नेहल याना नंदलाल हिलाल पाटील व राहुल नंदलाल पाटील यांनी शिवीगाळ व मारहाण केली होती.

२४ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता खळ्यात राहुल पाटील याने धमकी दिली होती की माझा भाऊ, वडील आम्ही तिघी तुझ्या आईवडिलांना मारून टाकू, असे मायाबाई हिला पंकजने संगितले होते आणि तो घाबरून जाऊन त्याने दुपारी दीड वाजेच्या सुमारास  खळ्यातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. असा आरोप मुलाच्या आईने केल्याने तिच्या फिर्यादीवरून २१ एप्रिल रोजी अमळनेर पोलीस स्टेशनला नंदलाल पाटील व त्याचा मुलगा राहुल पाटील यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता १०८, १५१(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *