अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पातोंडा येथील ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हे ग्राम पंचायत सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार चालवत आहेत. तसेच पंधराव्या वित्त आयोगाचे कामेही आपल्या जवाई व त्यांच्या मित्रांना देण्याचे प्रकार करीत आहेत. या कामाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधीची तक्रार आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून ग्राम पंचायत सदस्य तथा माजी उपसरपंच नितीन पारधी यांनी केली आहे. चौकशी होऊन कारवाई न झाल्यास 1 मे महाराष्ट्र दिनी जिल्हा परिषद भवनासमोर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
पातोंडा ग्राम पंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे गावातील कुठलाही ग्रामस्थ काही काम घेऊन गेले असता ते प्रत्येक ग्रामस्थांना उलटसुलट उत्तरे देवून, शासन व प्रशासन किती चुकीचे असून अशी बतावणी करून ग्रामस्थांना खाली हात पलटवून लावतात. ग्रामविकास अधिकारी यांनी मागील वर्षाच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या ऑनलाईन ई-टेंडर झालेल्या कामाची स्थगितीबाबत कुठल्याही प्रकारची सूचना न देता ग्राम पंचायत सदस्यांना अंधारात ठेवले. तसेच सद्यस्थितीत काही कामांना स्थगिती असून देखील ग्रामविकास अधिकारी यांनी मनमानीपणे पंधराव्या वित्त आयोगाच्या कामांना सुरवात करून संबंधित कामे मी माझ्या मर्जीतील माझे नाते संबंधातील व मित्राना देईल, तुम्हाला जे करता येईल ते करा असे धमकीवजा भाषा खुद्द ग्राम पंचायत सदस्यांना करीत आहेत. ठेकेदार कोण आहे याची साधी माहिती देखील ग्रामसेवक ग्राम पंचायत पदाधिकारी यांना देत नाहीत.त्यामुळे त्यांच्या काळातील सुरू असलेल्या व झालेल्या सर्व कामे ही नित्कृष्ठ दर्जाची असून ते काम आजच्या घडीला मरणावस्थेत आहेत. त्यामुळे सर्व कामांची निःपक्षपातीपणे चौकशी होऊन संबंधित ग्रामविकास अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंबंधीची तक्रार माजी सरपंच नितीन पारधी यांनी आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून अनेकदा केली आहे.मात्र प्रशासनाकडून त्यांच्या तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने त्यांनी महाराष्ट्र दिनी जिल्हा परिषद समोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.