मुख्यमंत्री फडणवीस यांचे आ शिरीष चौधरींसह शिष्टमंडळास आश्वासन
अमळनेर( प्रतिनिधी) निम्न तापी पाडळसे धरणास लवकरच मोठा निधी उपलब्द करून देणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळास दिली असल्याची माहिती आ शिरीष चौधरी यांनी दिली.धरणासाठी सुरु असलेल्या साखळी उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आमदारांनी नुकतीच मुंबई येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
या शिष्ट मंडळात आंमदारांसोबत धुळे येथील शिवसेनेचे माजी आमदार शरद पाटील, जळगाव जिल्हा सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष तथा मारवडचे लोकनियुक्त सरपंच उमेश साळुंखे,शिवसेनेचे अमळनेर विधानसभा मतदार संघ संपर्क प्रमुख दिपक पाटील,अमळनेर तालुका प्रमुख विजुमास्तर आदी उपस्थित होते. धंरणासाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून द्यावा या मागणीचे आमदारांनी देत हे धरण केवळ अमळनेर तालुकाच नव्हे तर परिसरातील सहा तालुक्यांसाठी नवसंजीवनी ठरणारे असून संबधित सर्व तालुक्यातील गावांमध्ये पाणी प्रश्न अत्यंत गंभीर आहे,यामुळे धरण हाच मोठा आशेचा किरण असून ते पूर्णत्वास आल्यास संबधित तालुक्यातील शेतीला पुरेसे पाणी मिळून शेतकऱ्याच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे.यामुळे कोणत्याही परिस्थितीत धरणास मोठा निधी देऊन लवकर हे धरण पूर्ण करण्यात यावे अशी विनम्र मागणी आंमदारांसह शिष्ट मंडळातील पदाधिकार्यांनी केली.तसेच अमळनेर तालुक्यातील पाडळसरे धरण जनआंदोलन समिती गेल्या 10 दिवसांपासून साखळी उपोषणाला बसली असल्याची कल्पना देखील मुख्यमंत्र्यांना देण्यात आली.
सदर मागणी व निवेदनाच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी लवकरच मोठा निधी उपलब्द करून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे आ चौधरी यांनी सांगत जनतेच्या व उपोषण कर्त्यांच्या भावना कर्तृत्ववान मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचल्या असल्याने त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवून तूर्तास सुरु असलेले उपोषण स्थगित करावे अशी जाहीर विनंती आमदारांनी जनआंदोलन समितीस केली आहे.