अमळनेर (प्रतिनिधी) महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील झाडी येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसानी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील झाडी येथील ३७ वर्षीय महिलेची ओळख २००८ मध्ये चारूदत्त विलास पाटील (वय ३७, रा. झाडी, ह.मु. कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर) याच्याशी झाली होती. महिलेचा पती दारू पीत असल्याने चारूदत्त याने महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या गावी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. सदर महिला पतीसोबत नाशिक येथे राहायला गेली असता नाशिक येथेही तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर त्याला कुऱ्हा काकोडा ता. मुक्ताईनगर येथे नोकरी लागल्याने तो तेथे निघून गेला. सदर महिलेचे फोन उचलणे बंद केल्यानंतर तिने समक्ष जाऊन जाब विचारला असता त्याचे इतर महिलेशी ही अनैतिक संबंध असल्याचे आढळून आले. त्यावेळी त्याने पीडित महिलेला लग्नास नकार दिला आणि शिवीगाळ करत मारहाण केली. या त्रासाला कंटाळून महिलेने गंगापूर पोलीस ठाण्यात चारूदत्त याच्याविरोधात फिर्याद दिली, त्यानंतर ६ रोजी ती फिर्याद मारवड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करत आहेत.